शेतकरी संघाची जागा कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांनी दसर्‍यानंतर तात्काळ परत करावी ! – मुंबई उच्च न्यायालय 

कोल्हापूर – भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या मालकीच्या इमारतीमधील २ मजले जिल्हाधिकार्‍यांनी नवरात्रोत्सवाचे कारण पुढे करत अधिगृहीत केले होते. या विरोधात शेतकरी संघाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने शेतकरी संघाची जागा जिल्हाधिकार्‍यांनी दसर्‍यानंतर २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तातडीने परत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संघाचे अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई यांनी दिली. ‘अशा प्रकारे कुणाचीही जागा अधिग्रहण करता येत नसल्याचे निष्कर्षही न्यायालयाने नोंदवले आहेत’, असेही देसाई यांनी सांगितले.

ही जागा कह्यात घेण्यास विरोध असतांना जिल्हाधिकार्‍यांनी बळजोरीने संघाचा विरोध डावलून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कह्यात घेतली आहे. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी दर्शन मंडप आणि अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. याला विरोध करत संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता; मात्र त्यानंतरही जिल्हाधिकार्‍यांनी जागा परत देण्यास नकार दिला. यामुळे संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

संघाकडून साखर, पेढे वाटून आनंदोत्सव ! 

 न्यायालयीन निर्णयानंतर संघाचे पदाधिकारी, कर्मचारी यांनी भवानी मंडपात साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.