पुणे – येथे चलचित्र (व्हिडिओ) प्रसारित करण्याची धमकी देत पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीचे संबंध होते. ‘या संबंधांची माहिती पतीला देईन’, अशीही धमकी त्याने दिली होती. अनेक प्रकारच्या धमक्या देत त्याने या महिला नगरसेविकेवर वारंवार बलात्कार केला. वर्ष २०१७ पासून हा सगळा प्रकार चालू असल्याचे महिलेने सांगितले आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली असून सचिन काकडे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी १० लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार हा सगळा प्रकार केल्यानंतर २ दिवसांपूर्वी आरोपी सचिन काकडे नगरसेविकेच्या घरी आला होता. या वेळी दोघांमध्ये वादावादी झाली. ‘माझी पत्नी तुझ्यामुळे पळून गेल्याचे’ही त्याने म्हटले. या सगळ्या त्रासाला कंटाळून महिला नगरसेविकेने थेट पोलिसांत धाव घेतली. त्यांच्यावर झालेल्या या बलात्कारामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.