श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ !

१५ ऑक्टोबर या दिवशी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते घटस्थापना

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात, तसेच संबळाच्या निनादात ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी मंचकी निद्रेचा विधी पार पडला. प्रारंभी पंचामृत अभिषेक, विधीवत् पूजन आणि आरतीनंतर श्री तुळजाभवानीदेवीला शयनगृहात नेण्यात आले. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या या निद्रेस ‘भोगनिद्रा’ म्हटले जाते. श्री भवानीदेवीची मूर्ती ‘चलमूर्ती’ असल्याने वर्षभरात तीन वेळेस या मूर्तीस मंचकी निद्रेच्या निमित्ताने सिंहासनावरून हलवण्यात येते. यात शारदीय नवरात्रीपूर्वी आणि नवरात्रीनंतर, तसेच पौष मासात शाकंभरी नवरात्राच्या प्रारंभी श्री तुळजाभवानी मातेचा मंचकी निद्रा विधी पार पडतो.

शहरात व्यापारी आणि मंदिर प्रशासन यांकडून शारदीय नवरात्री महोत्सवाची सिद्धता मोठ्या उत्साहाने करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात मुख्य घटस्थापनेचा विधी  १५ ऑक्टोबर या दिवशी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भोपे पुजारी मंडळ, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, मंदिराचे महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा आणि हाब्रोजी आदी उपस्थित असणार आहेत.