नौपाडा (ठाणे) येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर यांच्‍या  आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर त्‍यांच्‍या यजमानांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

७.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

२७.९.२०२३ या दिवशी ठाणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या साधिका सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. ७.१०.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्‍या निमित्त त्‍यांचे पती श्री. नंदकिशोर ठाकूर यांना त्‍यांच्‍या शेवटच्‍या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सौ. नम्रता ठाकूर

१. शेवटचे आजारपण

१ अ. पत्नीचा अंतिम समय जवळ आल्‍याविषयी साधकाला मिळालेली पूर्वसूचना ! : ‘माझी पत्नी सौ. नम्रता ठाकूर साधारण २५.६.२०२३ या दिवसापासून रुग्‍णाईत होती. ३.७.२०२३ या दिवशी रुग्‍णालयातून घरी आणल्‍यानंतर तिला स्‍मृतीभ्रंश झाल्‍याचे माझ्‍या लक्षात आले. त्‍या वेळी आरंभीच्‍या काळात ती असंबद्ध बोलत असे. ‘माझे बाळ गेले’, असे म्‍हणून ती रडत असे. ती आमच्‍या पूर्वजांचे नाव घेऊन त्‍यांची आठवण काढत असे. गुरुदेवांच्‍या कृपेने अनेक जणांच्‍या बोलण्‍यातून ‘व्‍यक्‍तीच्‍या जीवनाची अंतिम घटिका समीप आल्‍यावर तिचे वागणे कसे होते ?’, या विषयी माझा अभ्‍यास झाला होता. त्‍या वेळी अंतिम समयी ‘पूर्वज आले आहेत’, असे दिसते किंवा ‘अंधार अन् घाणीचे साम्राज्‍य दिसते’, असे हे लोक सांगत असत. माझ्‍या पत्नीच्‍या बोलण्‍यातही तशीच सूत्रे होती. त्‍या वेळी मला वाईट वाटले.

१ आ. पत्नीकडून सतत साधनेचे विचार होऊन त्‍याप्रमाणे प्रयत्न होणे : त्‍यानंतर ती साधनामय होत गेली. ‘तिच्‍याकडून सातत्‍याने साधनेचे विचार होऊन त्‍याप्रमाणे कृती होत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. ती ‘स्‍वतःवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढणे, नामजप करणे, गुरुमाऊलींची आठवण काढणे, त्‍यांना प्रार्थना करणे, कृतज्ञता व्‍यक्‍त करणे’, असे साधनेचे प्रयत्न करत असे.

१ इ. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी पत्नीची आध्‍यात्‍मिक पातळी ६७ टक्‍के झाल्‍याचे सांगणे आणि त्‍यानंतर तिच्‍या शारीरिक अन् मानसिक स्‍थितीत सकारात्‍मक पालट होणे : २.८.२०२३ या दिवशी सद़्‍गुरु अनुराधा वाडेकरताई घरी आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी ‘सौ. ठाकूरकाकूंची आध्‍यात्‍मिक पातळी ३ टक्‍क्‍यांनी वाढून ती ६७ टक्‍के झाली आहे’, असे त्‍यांनी सांगितले. तेव्‍हा त्‍यांनी नम्रताच्‍या डोक्‍यावरून हात फिरवला. त्‍या वेळी ती ध्‍यानावस्‍थेत गेल्‍याचे मला जाणवले. नंतर तिच्‍या शारीरिक आणि मानसिक स्‍थितीमध्‍ये सकारात्‍मक पालट होत गेले.

श्री. नंदकिशोर ठाकूर

२. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे

२ अ. थोडे बरे वाटू लागल्‍यावर सेवा करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करणे : एक दिवस ती उठून बसली. आम्‍ही तिला बैठकीच्‍या खोलीमध्‍ये आणले. तेथे ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होती. दैनिक वाचत असतांना तिने भ्रमणभाषवरून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना लघुसंदेश करून कळवले, ‘मला सेवा दे.’ (‘सौ. ठाकूर संगणकीय टंकलेखनाची सेवा करत असत. त्‍यांना थोडे बरे वाटू लागल्‍यावर लगेच त्‍यांनी त्‍यांना सेवा देणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना वरील लघुसंदेश केला.’ – संकलक) तिने लघुसंदेश केल्‍याचे आम्‍हाला ठाऊक नव्‍हते. सौ. मीनल शिंदे यांनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘काकू ठीक झाल्‍या का ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना सांगितले, ‘‘तिची इच्‍छाशक्‍ती जागृत झाली आहे. मी तुला ती संपूर्ण बरी झाल्‍यावर कळवतो.’’ आम्‍हालाही जणू वाटू लागले, ‘ती बरी होणार आहे.’

२ आ. रक्षाबंधनाच्‍या दिवशी साडी नेसून भावाला राखी बांधून ओवाळणे : ३०.८.२०२३ या रक्षाबंधनाच्‍या दिवशी आमच्‍या मुली आणि सून यांनी नम्रताला साडी नेसवून आसंदीवर बसवले. नम्रताने तिच्‍या भावाला राखी बांधून ओवाळले. अशा प्रकारे आम्‍ही तिच्‍याकडून प्रयत्न करून घेत होतो आणि त्‍यातून आम्‍हालाही आनंद मिळत होता. त्‍यानंतर ती पलंगावर खिळली.

२ इ. भक्‍तीसत्‍संगात ‘श्रीकृष्‍ण गोप-गोपिकांना काला भरवत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करत असतांना आलेली अनुभूती !

२ इ १. पत्नीला दही भरवू लागल्‍यावर तिने सांगितल्‍याप्रमाणे प्रथम गुरुदेवांना सूक्ष्मातून दही भरवणे आणि त्‍या वेळी भावजागृती होणे : नम्रता प्रत्‍येक गुरुवारचा भक्‍तीसत्‍संग ऐकत असे. गोकुळाष्‍टमीनिमित्त झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगात सर्वांकडून भावजागृतीचा पुढील प्रयोग करून घेण्‍यात आला, ‘श्रीकृष्‍णाने काला केला आहे. श्रीकृष्‍ण सर्व गोप-गोपिकांना काला भरवत आहे. त्‍या कार्यात आपणसुद्धा सहभागी झालो आहोत आणि श्रीकृष्‍ण आपल्‍यालाही काला भरवत आहे.’ भावजागृतीचा प्रयोग करतांना मला वाटले, ‘आपणसुद्धा काला म्‍हणून घरात नैवेद्यासाठी काही आहे का ?’, हे पाहूया. त्‍या वेळी घरात केवळ दही होते. मी ते दही नम्रताला भरवण्‍याचे ठरवले. तिला भरवायला गेल्‍यावर ती प.पू. गुरुदेवांच्‍या छायाचित्राकडे बोट करून म्‍हणाली, ‘‘त्‍यांना भरवा. नंतर मला भरवा.’’ त्‍यामुळे मी परम पूज्‍यांना सूक्ष्मातून दही भरवले आणि नंतर नम्रताला भरवले. दही खाल्‍ल्‍यावर तिच्‍या चेहर्‍यावरचे भाव पालटले. तिच्‍या चेहर्‍यावरचे भाव बघून माझा भाव जागृत झाला. माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू आले आणि ते थांबत नव्‍हते. अशा प्रकारे गुरुदेवांच्‍या कृपेने आम्‍ही दोघेही आनंदी झालो.

२ ई. पिठोरी अमावास्‍येच्‍या दिवशी मुलांना वाण देणे आणि सुवासिनींना सनातनचे ग्रंथ भेट म्‍हणून देणे : १४.९.२०२३ या पिठोरी अमावास्‍येच्‍या दिवशी पलंगावर खिळलेल्‍या स्‍थितीत तिने मुलांना वाण देऊन आशीर्वाद दिला. (‘पिठोरी अमावास्‍येच्‍या दिवशी मुलांना वाण देण्‍याची प्रथा आहे.’ – संकलक) तिने घरी आलेल्‍या सुवासिनींना सनातनचे लघुग्रंथ भेट म्‍हणून दिले. त्‍या माध्‍यमातून तिची ‘ज्ञानशक्‍ती प्रसार अभियाना’च्‍या अंतर्गत सेवा झाली. ‘अंतिम समयी तिच्‍या कुठल्‍याही इच्‍छा अपूर्ण राहिल्‍या नाहीत. ती कुणातही अडकली नाही’, असे माझ्‍या लक्षात आले. हे सर्व गुरुकृपेने शक्‍य झाले.

२ उ. कुटुंबियांशी शब्‍दविरहित संभाषण होणे आणि आत्‍म्‍याद्वारे एकमेकांशी संवाद साधत असल्‍याचे जाणवणे : शेवटचे २ दिवस नम्रता, मी आणि माझी मुलगी यांच्‍यात शब्‍दांतून संवाद होत नव्‍हता; परंतु ‘तिला काय हवे ? कुठे दुखत आहे ? काय त्रास होत आहे ?’, हे मला अन् माझ्‍या मुलीला कळत होते. आम्‍हाला जे काही बोलायचे होते, ते नम्रताला कळत होते. ‘आम्‍ही आत्‍म्‍याद्वारे संवाद साधत होतो आणि आम्‍हाला सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमुळेच ही शक्‍ती प्राप्‍त झाली होती’, असे मला जाणवले.

३. निधन

२६.९.२०२३ या दिवशी रात्री १.३० वाजता माझ्‍या मुलीने नम्रताच्‍या बोटाला ‘ऑक्‍सिमीटर’ (रक्‍तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्‍याचे यंत्र) लावले. तेव्‍हा ते काही ‘रीडिंग’ दाखवत नव्‍हते. त्‍यानंतर मुलीने तिच्‍या सर्व बोटांना ‘ऑक्‍सिमीटर’ लावले. तेव्‍हा केवळ डाव्‍या हाताच्‍या तर्जनीला ‘ऑक्‍सिमीटर’ लावल्‍यावर ते ऑक्‍सिजनचे प्रमाण दाखवत होते. तेव्‍हा आमच्‍या लक्षात आले, ‘हळूहळू नम्रताची प्राणज्‍योत मालवत आहे.’ २७.९.२०२३ या दिवशी नम्रताने देह ठेवला.

४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. नम्रताने देह ठेवल्‍यावर घरातील वातावरणात निरव शांतता आणि प्रसन्‍नता जाणवत होती.

आ. मी आणि अन्‍य दोघींनी रामरक्षा अन् गीतेतील पंधरावा अध्‍याय मोठ्याने म्‍हटला, तसेच भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप सतत चालू होता. त्‍यामुळे वातावरण आनंदी होते.

इ. वातावरणात कोणताही दाब जाणवत नव्‍हता. घरात कोणालाही दुःख वाटून रडू येत नव्‍हते.

ई. नम्रताचे स्‍मशानभूमीतील अंत्‍यविधी करत असतांना माझा ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप चालू झाला. त्‍या वेळी मला तेथे शिवाचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

‘आपण मनापासून आणि अपेक्षाविरहित साधना करत राहिलो, तर गुरुदेव अंतिम क्षणी आपल्‍याला मोक्षाला नेतात’, याची प्रचीती मला माझ्‍या पत्नीच्‍या आजारपणात आली. ‘गुरुकृपा काय असते ?’, हे अनुभवायला दिल्‍याबद्दल मी गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. नंदकिशोर पुरुषोत्तम ठाकूर ((कै.) सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर यांचे पती, वय ६५ वर्षे), नौपाडा, ठाणे. (२.१०.२०२३)

सौ. ठाकूर यांच्‍या नातीने अंत्‍यदर्शनाच्‍या वेळी ‘देवी मां !’, अशी हाक मारून त्‍यांना हळद-कुंकू लावणे आणि ‘सौ. ठाकूर देवीतत्त्वात विलीन झाल्‍या’, असे जाणवणे

‘माझी नात कु. अनिशा (वय ४ वर्षे) हिला आजीच्‍या अंतिम दर्शनासाठी आणले. त्‍या वेळी ती दारातूनच आजीकडे हात करून म्‍हणाली, ‘‘देवी मां !’’ त्‍यानंतर तिने आजीला हळद-कुंकू लावले आणि ती आजीच्‍या पाया पडली. तिच्‍या माध्‍यमातून ‘नम्रता देवीतत्त्वात विलीन झाली’, असे गुरुदेव सर्वांना सांगत आहेत’, असे मला जाणवले.’

– श्री. नंदकिशोर पुरुषोत्तम ठाकूर ((कै.) सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर यांचे पती), ठाणे (२.१०.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक