विज्ञापनातून दिशाभूल केल्याचे प्रकरण
मुंबई – विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये अमिताभ बच्चन यांना १० लाख रुपये दंड ठोठावण्याची मागणी ‘कॅट’कडून करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डेज सेल’चे विज्ञापन केले आहे. ८ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत या ‘सेल’चे आयोजन करण्यात येणार आहे. या विज्ञापनात अमिताभ बच्चन यांनी ‘बिग बिलियन डे सेल’मध्ये भ्रमणभाष ज्या किमतीत मिळतील, त्या किमतीत ते कोणत्याही ‘मोबाईल स्टोअर’मध्ये ऑफलाईन मिळणार नाहीत’, असे म्हटले आहे. या विरोधात ‘कॅट’ने केलेल्या तक्रारीमध्ये या विज्ञापनामध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे ‘अन्य व्यापार्यांच्या विक्रीवर परिणाम होईल’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :विज्ञापनांतून वस्तूंविषयी मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्ण माहिती आढळून येते. याविरोधातही सरकारने कठोर कायदा करणे अपेक्षित आहे ! |