रंगमंचाच्या आकारामुळे नाट्य निर्मात्यांनी फिरवली पाठ !
पिंपरी (जिल्हा पुणे) – निगडी, प्राधिकरण, रावेत भागांतील नाट्यरसिकांना नाटकांचा लाभ घेता यावा याकरता ‘ग.दि. माडगुळकर नाट्यगृह’ निर्माण केले. ८० कोटी रुपये व्यय करून सज्ज केलेल्या या नाट्यगृहाला ४ मास झाले तरी एकही नाटकाचे सादरीकरण झाले नाही. नाट्यगृह चांगले असूनही केवळ रंगमंचाच्या आकारामुळे नाट्य निर्मात्यांनी पाठ फिरवली आहे. सध्या तेथे उपाहारगृहाचीही वानवा आहे. जर नाटकाचे प्रयोगच होणार नसतील, तर महापालिकेने ८० कोटी रुपये व्यय करण्याची काय आवश्यकता होती ? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
या नाट्यगृहाची इमारत ३ मजली असून ७०० आसन क्षमता असलेले मुख्य नाट्यगृह, २१३ आसन क्षमता असलेले छोटे नाट्यगृह, बैठक खोली (कॉन्फरन्स हॉल), रंगकर्मींना रहाण्यासाठी १२ खोल्या आणि कलादालन अशी व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु नाट्यगृहाची व्यवस्था पहाण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. सध्या व्यवस्थापक नाट्यगृहाच्या बाहेर पत्र्याच्या खोलीतून व्यवस्था पहात आहेत. त्यामुळे नाट्यगृहाचा आराखडा सिद्ध करण्यात काय त्रुटी आहेत, याचा महापालिकेने विचार केला नाही का ? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे की, या नाट्यगृहातील मुख्य रंगमंचाची रचना ही ‘सी शेप’ (अर्धगोलाकार) केली आहे. बैठक व्यवस्थाही त्याच पद्धतीने केली आहे. ही रचना व्यावसायिक नाटकांना अडचणीची ठरते. त्यामुळे तेथे नाटकांचे प्रयोग घेता येत नाहीत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते म्हणाले की, या नाट्यगृहात ज्यांनी कार्यक्रम घेतले आहेत, त्यांच्याकडून आम्ही सूचना मागवल्या आहेत. त्यावर २-३ दिवसांमध्ये निर्णय घेऊ. उपाहारगृहाची निविदा करण्यात येईल.
संपादकीय भूमिका :
|