म्हादई जलवाटप तंटा !
पणजी, ५ ऑक्टोबर (वार्ता.) : कर्नाटक सरकारने कळसा, सुर्ला आणि हलतरा नाला या ठिकाणी धरण बांधून येथील पाणी कर्नाटकमधील मलप्रभा नदीत वळवण्याचे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी निविदा काढली आहे. धरणाच्या ‘सविस्तर प्रकल्प अहवाला’ला केंद्रीय जल आयोगाने यापूर्वीच संमती दिली आहे. कर्नाटक येथील खानापूरस्थित ‘कर्नाटक निरवरी निगम’ या शासकीय आस्थापनाने ही निविदा काढली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्याचा उल्लेख निविदेत करण्यात आला आहे. वास्तविक कर्नाटक सरकारला म्हादईचे पाणी वळवण्यासाठी धरण प्रकल्प उभारण्यास पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांच्याकडून अनुज्ञप्ती मिळालेली नाही, तरीही ‘कर्नाटक निरवरी निगम’ कळसा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
‘कर्नाटक निरवरी निगम’ने निविदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक सरकारने कळसा, सुर्ला आणि हलतरा नाला यांचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्याचे ठरवले आहे; मात्र वास्तविक या नाल्यांचे पाणी नैसर्गिकरित्या गोव्यातील म्हादई नदीत प्रवाहित होते. निविदेमध्ये पंप बसवणार असलेल्या ठिकाणापासून ते कळसा या मार्गावर वाहिनी बसवणे, तसेच ११ के.व्ही. क्षमतेची मोटर (यंत्र), ११० के.व्ही.चे वीज उपकेंद्र आणि ११० के.व्ही. क्षमतेची वीजवाहिनी आदी यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करणे यांचाही समावेश आहे. ‘कर्नाटक निरवरी निगम’ने हलतरा धरण बांधण्याचाही निर्णय घेतला आहे. या धरणामुळे सुर्ला नाल्याचे पाणी ८ ठिकाणी वळवण्यात येणार आहे. यासाठी वनभूमी संपादन प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.