१. गणेशोत्सवासाठी घरी गेल्यावर अनिष्ट शक्तीचे आवरण आल्याने ‘आश्रमात येऊ नये’, असे वाटणे; परंतु मनाचा निर्धार करून आश्रमात येणे : ‘मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मी गणेशोत्सवासाठी सासवड (जिल्हा पुणे) येथे घरी गेलो होतो. त्या ८ – १० दिवसांत माझे शरीर फार जड झाल्यासारखे वाटत होते. ९.९.२०२२ या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन झाल्यावर दुसर्या दिवशी ‘घरीच झोपून रहावे. देवद आश्रमात जाऊ नये’, असे मला वाटत होते. तरीही मी मनाचा निर्धार करून देवद आश्रमात आलो. येथेही मला ‘झोपून रहावे’, असेच वाटत होते.
२. ‘आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी मिळत असतांनाही तो करू नये’, असे वाटणे, तरीही कुणीतरी बलपूर्वक विधी करण्यासाठी बसवणे : आश्रमातील एका साधकाने मला कळवले की, १२.९.२०२२ या दिवशी तुम्ही आश्रमात श्राद्धविधी करू शकता. त्या वेळी मला क्षणभर वाटले, ‘त्यांना सांगावे की, मला येथे विधी करायचा नाही.’ श्राद्धाच्या दिवशीही सकाळी डोके फार जड झाले होते. ‘श्राद्धस्थळी जाऊच नये’, असे वाटत होते; परंतु कुणीतरी मला बलपूर्वक बसवल्याप्रमाणे मी विधीच्या ठिकाणी विधी करण्यास बसलो.
३. श्राद्धविधी चालू झाल्यावर पुष्कळ उत्साह निर्माण होणे आणि परम पूज्य गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : पुरोहितांनी विधी चालू केला. साधारण एक घंट्यानंतर ‘माझ्यातील मरगळ, आळस आणि निरुत्साह उणावत आहे’, असे मला जाणवले. माझे संपूर्ण शरीर अत्यंत हलके झाले होते. माझे जड झालेले डोकेही केव्हा हलके झाले, हे मला कळलेच नाही. मला परम पूज्य गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) अस्तित्व जाणवायला लागले. या विधींमुळे इतका उत्साह निर्माण झाला की, तो मी शब्दात मांडूच शकत नाही.
४. विधीच्या वेळी मृत नातेवाईक डोळ्यांसमोर दिसू लागणे आणि परम पूज्य साधकांच्या पितरांनाही आनंदी करून त्यांनाही साधनेकडे वळवत असल्याच्या विचाराने भावजागृती होणे : विधीच्या वेळी माझे मृत नातेवाईक डोळ्यांसमोर दिसू लागले. ते सर्व आनंदी दिसत होते. त्यांचा आनंद पाहून पुरोहित सांगत असलेले सर्व विधी माझ्याकडून उत्साहाने केले जात होते. ‘परम पूज्य गुरुदेव आम्हा साधकांची किती काळजी घेत आहेत ? आमच्यासह आमच्या पितरांनाही आनंदी करून त्यांनाही साधनेकडे वळवत आहेत’, या विचारांनी माझी भावजागृती झाली.
केवळ परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेमुळे मला आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी मिळाली. परम पूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या अनुभूतीसाठी त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१२.९.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |