४ ऑक्टोबर या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘प्रख्यात कविवर्य, महान नाटककार, लेखक आणि ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज म्हणजेच श्रीमान वि.वा. शिरवाडकर म्हणतात, ‘‘ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे. देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोचता येत नाही, ते आकाशात उंचावर गेलेल्या कळसाला दुरून नमस्कार करतात. भल्यामोठ्या ग्रंथाचा एका वाक्यात सारांश काढावा, त्याप्रमाणे हा देखाव्याचा सारांशच असतो. ‘ज्ञानेश्वरी’चा वाचन प्रवास हा हिरेमाणकांनी खचलेल्या; पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुहेतील प्रवास आहे. तो प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो. तेव्हा ‘चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्याभोवती उजाडते आहे’, असे वाटते.
सर्व वादांच्या पलीकडे असलेल्या निखळ माणसाला माणसामधील सुजानतेच्या सोलीव गाभ्याला, त्या वागीश्वराच्या प्रतिभेने येथे मिठीत घेतलेले आहे.
पसायदान ही प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे सर्वाधिक वैशिष्ट्य हे की, ती धर्म, ग्रंथ, पंथ आणि काळ या सर्वांच्या अतीत आहे. सर्व आणि सर्वकालीन मानवजातीसाठी केलेली प्रार्थना आहे. (येथे) प्रसाद मागणारा ‘मी’; पण जे मागितले आहे, त्यात ‘मी’चा लवलेशही नाही. गीताभाष्याच्या गंगाप्रवाहात निमज्जन करतांना ‘स्व’ आणि स्वकीयांचे सर्व लाभालाभ निखळून पडले आहेत आणि देहातील चैतन्य सार्या चराचराशी एकरूप होणार्या आत्मनेत संक्रांत झालेले आहे.
इथे कोणत्याही पंथाचा निर्देश नाही. येथील देव ‘विश्वात्मक’आहे. ज्ञानेश्वरांची ईश्वरविषयक कल्पना येथे सारस्वरूपात प्रकट झालेली आहे. येथे वाद संपले आहेत. तर्क मावळलेले आहेत. ज्ञानाचे विसर्जन भक्तीत झालेले आहे. मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्टे ज्या प्रवृत्तीतून उत्पन्न होतात, ते खलत्व अभिलाषेतून स्वार्थांधतेतून आणि स्वामित्वाच्या उन्मादातून निर्माण होणारे खलत्व, अन्याय, अत्याचार, सामाजिक विषमता अन् विघातक स्पर्धा यांच्या पाठीशी माणसाची ही खलवृत्ती, व्यक्तीगत नि सांघिक स्वरूपात कार्य करत असते; म्हणून ‘वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ।।’,असे सर्वमंगल सर्वत्र निर्माण व्हायचे असेल, तर अगोदर ही खलवृत्ती नष्ट व्हायला हवी; म्हणून पसायदानातील पहिला उल्लेख आहे, तो खळांच्या व्यंकटीचा ! त्यातील काटेकुटे, अडथळे दूर केले तरच रस्ता स्वच्छ होईल. उद्दिष्टाकडे जाण्याचा प्रवास सुकर होईल.’’
(साभार : ‘प्रसाद’, ऑगस्ट १९९०, श्री ज्ञानेश्वरी विशेषांक)