पार्ट्यांचा सामाजिक माध्यमाद्वारे प्रचार : कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन
पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) : आठवडा अखेर शनिवार आणि रविवारची सुट्टी आणि सोमवारी गांधी जयंतीच्या निमित्ताने असलेली सार्वजनिक सुट्टी यांमुळे गोव्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्रकिनार्यांवर २९ सप्टेंबरपासून रात्रभर चालणार्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे आणि कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. सामाजिक माध्यमातून या पार्ट्यांचा प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे पार्ट्यांचे विज्ञापन करतांना ती बंद जागेत केली जाणार असल्याचे म्हटलेले आहे आणि यातील बहुतेक जागा समुद्राच्या अगदी जवळ आहेत. या ठिकाणी ‘कोस्टल रेग्युलेशन झोन’ नियमाचे उल्लंघन झाले आहे. ३० सप्टेंबर या दिवशी वागातोर येथे ‘थंडरस ट्युन्स’ या नावाने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले. अशाच प्रकारे ‘हार्वेस्ट मून’ या नावाने एक पार्टी २९ सप्टेंबर या दिवशी चालू झाली असून ती १ ऑक्टोबरच्या रात्री उशिरापर्यंत चालणार होती. अशाच प्रकारे ‘फूल मून बीच बॅश’,‘सॅटर्डे नाईट फीवर’, ‘बॉली बॅश सॅटर्डे’, ‘पिरामिड’, ‘हाऊस पार्टीज’, ‘सनराईज कार्डीयो’ आदी नावांनी समुद्रकिनारपट्टीवर पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या रशियाचे पर्यटक गोव्यात आलेले असल्याने ऑक्टोबर मासात अशाच प्रकारे आणखी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
(सौजन्य : OHeraldo Goa)
संपादकीय भूमिकापोलिसांना हे ऐकू येत नाही कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्यांशी साटेलोटे आहे ? |