देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्या सौ. केतकी येळेगावकर यांचा भाद्रपद कृष्ण प्रतिपदा (३०.९.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांच्या सहसाधिका सौ. मीना खळतकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढे दिली आहेत.
सौ. केतकी कौस्तुभ येळेगावकर यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !
१. शारीरिक व्याधी असतांनाही तळमळीने सेवा करणे
१ अ. पोटाच्या व्याधीमुळे होणार्या त्रासातही सेवेला प्राधान्य देणे : ‘सौ. केतकीताईंना सेवेचा ध्यास आणि तळमळ आहे. काही मासांपूर्वी त्यांचे पोट प्रतिदिन दुखायचे. थोडासा महाप्रसाद घेतला, तरी पोटाला सूज यायची; परंतु ताई विश्रांती घेत नसत. तेव्हा ताई कधीही ‘मला त्रास होतो, सलग सेवा जमत नाही’, असेसुद्धा म्हणाल्या नाहीत. पोटाचा त्रास दाखवण्यासाठी आश्रमाच्या बाहेर चिकित्सालयात सकाळी १० वाजता जायचे असेल, तरी त्या स्वतःचा डबा भरायलाही वेळ न देता सेवाच करायच्या. त्यांना दुसर्या दिवशी सकाळी आश्रमाच्या बाहेर चिकित्सालयात जायचे असल्यास, त्या आदल्या रात्री बराच वेळपर्यंत सेवा करायच्या. एके दिवशी त्यांचा त्रास बघून ‘‘ताई, तुम्ही आश्रमाच्या बाहेर चिकित्सालयात जाऊन चाचणी करून घ्या’’, असे मी म्हणाले, तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘या सेवेसाठी साधक नाहीत.’’
त्यांना आश्रमातील अल्पाहार खाल्ल्यावर पोटाला सूज येते; म्हणून त्यांनी अल्पाहार ग्रहण करणे सोडले होते; पण त्या दिवसभर सेवा करायच्या. ‘सेवा देवाने दिली आहे आणि तोच करवून घेतो’, असा त्यांचा भाव असतो. त्या कर्तेपणा देवाला देतात.
बाहेरच्या चिकित्सालयातून चाचणी केल्यावर कळले की, त्यांना ‘हायपर अॅसिडिटी’ असून पोटात ‘बॅक्टेरिया’ झाले आहेत. त्यामुळे सूज येते. यावरून ‘त्यांना किती त्रास होत असेल !’, याची कल्पना येते.
१ आ. पायाला कुरुप झाल्यामुळे चालतांना त्रास होत असतांनाही पायाला पट्टी बांधून सेवा करणे : गेल्या ३ – ४ वर्षांपासून त्यांच्या पायाला ‘कुरुप’ झाले आहे. त्यात ‘पू’ होतो. त्यामुळे चालतांना त्यांचा पाय ठणकतो; पण त्या ‘मला त्रास होतो; म्हणून बसून करायची सेवा द्या’, असे कधीच म्हणत नाहीत. पायाला पट्टी बांधून प्रतिदिन पावसातून ये-जा करतात. त्यांच्यात पुष्कळ सहनशीलता आहे.
१ इ. जड सेवा करतांना कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता ‘देवच सेवा करवून घेणार’, असा भाव असणे : एखाद्या वेळेस जड सेवा करतांना कुणाचे साहाय्य नसते. मोजकेच साधक असतात. असे असतांना ‘कसे होणार ? मी एकटी कशी करणार ?’, असा विचार न करता आणि कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता ‘देवच सेवा करवून घेणार आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यांची कष्ट करण्याची सिद्धता असते. ‘मला देवाने सेवा दिली आहे आणि ती पूर्ण करायची आहे’, असा त्यांना ध्यास असतो.
१ ई. सेवेला वेळ मिळावा; म्हणून विश्रांतीच्या वेळेत जप करणे : त्या रात्री १२ – १ वाजता झोपतात आणि पहाटे उठून जप करतात. त्या दुपारच्या विश्रांतीच्या वेळेतही जप करतात. त्या कोणत्याच सेवेला ‘नाही’ म्हणत नाहीत.
१ उ. विश्रांती घ्यायला सांगितली असतांना झोपून न रहाता जमेल ती सेवा करणे : एकदा त्या रुग्णाईत असतांना त्यांना आधुनिक वैद्यांनी २ – ३ दिवस विश्रांती घ्यायला सांगितले होते; परंतु त्या खोलीतसुद्धा सेवेशी संबंधित नोंदवही भरत होत्या आणि भ्रमणभाषवरून सेवा करत होत्या.
१ ऊ. साधकसंख्येच्या आवश्यकतेनुसार सेवा करणे : आश्रमातील सेवेच्या वेळेत जी सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता असते, अशा सेवेला त्या प्राधान्य देतात. ज्या सेवा एकटीने करायच्या असतात, म्हणजे वहीत नोंदी करणे इत्यादी सेवा त्या खोलीत असतांना करण्यासाठी घेऊन जातात आणि रात्री उशिरापर्यंत करतात, तरीही सकाळी वेळेतच सेवेच्या ठिकाणी येतात.
२. ‘दिसेल, ते कर्तव्य’, या भावाने सेवा करणे
चौकटीत राहून सेवा न करता, दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करतात. रात्री ‘विभाग आवरायचा आहे’, असे लक्षात आल्यास प्रतिक्रिया न देता सर्व आवरून जातात.
३. ऐकण्याची वृत्ती असणे
त्यांची चूक नसतांनाही एखादी साधिका त्यांची चूक सांगत असल्यास त्या शांतपणे समोरच्याचे बोलणे ऐकून घेतात आणि पुन्हा त्यांच्याशी प्रेमाने बोलतात.
४. स्वीकारण्याची वृत्ती असणे
त्यांना कुणीही चुका सांगितल्या, तरी त्या लगेच स्वीकारतात.
५. अंतर्मुखता आणि शिकण्याची वृत्ती असणे
त्या स्वतःच्या चुका स्वतः सांगतात. ‘माझ्यात हे हे दोष आहेत. मला फार प्रयत्न करायला पाहिजेत. देव मला शिकवतो, घडवतो. शिकण्यात मीच उणी पडते’, असे त्या म्हणतात.
६. विचारण्याची वृत्ती असणे
बाहेरगावाहून त्यांच्या मुली (सौ. स्वराली पाध्ये, सौ. वैष्णवी पिसोळकर) त्यांना भेटायला आल्यावर ‘‘मी त्यांना थोडा वेळ देऊ का ?’’, असे उत्तरदायी साधिकेला विचारून घेतात.
७. इतरांचा विचार करत असल्याने इतरांना आधार वाटणे
त्या स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करतात; म्हणून विभागातील सर्वांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
८. मी त्यांना कधी ‘कुणाचे मन दुखावेल’, असे बोलतांना पाहिले नाही.
९. अनेक गुणांचा समुच्चय असणे
त्यांच्यात आपलेपणा, प्रेमभाव, नम्रता, कष्ट घेण्याची सिद्धता, इतरांना साहाय्य करणे, मनमिळाऊपणा, सहनशीलता, जवळीकता साधता येणे इत्यादी गुणांचे दर्शन होते.
‘हे श्रीगुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), सौ. केतकीताईंमधील गुण माझ्यात येण्यासाठी मला शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.८.२०२३)
सौ. केतकी येळेगावकर यांच्या नावाच्या अद्याक्षरांमध्ये दडलेली गुणवैशिष्ट्ये सांगणारे काव्य
सौ – सौम्य स्वभावाच्या सौ. केतकीताई ।
के – केले स्वतःला श्रीगुरुचरणी समर्पित ।
त – तळमळीने झोकून देऊन श्रीगुरुचरणांची सेवा करण्यासाठी ।
की – किती करू किती नको, माझ्या श्रीगुरूंसाठी असे वाटे त्यांना ।
ये – येता-जाता असे सेवेचा ध्यास त्यांना ।
ळे – ‘लेकरू तुझे अज्ञानी’, असे सांगती देवाला त्या ।
गा – गाभार्यात देवाच्या मानसरूपाने असतात त्या ।
व – वर्तन आदर्शवत् असते त्यांचे ।
क – कष्ट घेण्याची अविरत सिद्धता असे त्यांची ।
र – रत्नासारख्या हव्याहव्याशा वाटती सर्वांना त्या ॥ ५ ॥
अशा सर्वांच्या लाडक्या सौ. केतकीताई यांना वाढदिवसानिमित्त नमस्कार आणि शुभेच्छा !’
– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.८.२०२३)