पुणे – येथे ढोल ताशांच्या गजरात सकाळी ८.३० वाजता मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याचा मानाचा पहिला गणपति विराजमान झाला आहे, तर डॉ. आनंद उपाख्य नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते ११.३७ वाजता कसबा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
१. पुणे येथील मानाच्या दुसर्या गणपतीची म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीची सकाळी १० वाजता मिरवणूक काढण्यात आली. श्रींची मिरवणूक केळकर रस्त्यावरून चालू होऊन तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिराकडे आली. दुपारी १२.३० वाजता श्री भूषण महारुद्र स्वामी महाराजांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
२. तिसरा मानाचा गणपति गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचे आगमन वाजत गाजत एका आकर्षक रथातून झाले. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
३. मानाच्या चौथ्या ‘तुळशीबाग गणपति उत्सव मंडळ ट्रस्ट’च्या वतीने प्रभु श्रीरामचंद्राच्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक सकाळी ९.३० वाजता निघाली आणि सकाळी ११.३० वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
४. टिळक पंचांगानुसार मानाच्या पाचव्या गणपतीची म्हणजेच केसरीवाड्याची प्राणप्रतिष्ठापना २० ऑगस्ट या दिवशी झालेली आहे. ‘अखिल मंडई मंडळा’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता करण्यात आली.
संभाव्य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून गणेशोत्सवात ७ सहस्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी १ सहस्र ८०० सीसीटीव्हीही असणार आहेत.
संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना !
पुणे – गणपति बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या ४ मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात आली. कोतवाली चावडी येथील पारंपरिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या मंदिराची प्रतिकृती साकारलेल्या मंदिरात श्रीगणेश विराजमान झाले. सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.
यंदा दगडूशेठ गणपति मंडळाने श्रीराम मंदिराचा देखावा साकारला आहे. याच राम मंदिराच्या भव्य देखाव्यात लाडक्या बाप्पाची मूर्ती विराजमान झाली. श्री गणेशाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.