संभाव्‍य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून कडक बंदोबस्‍त !

पुणे येथे गणेशोत्‍सवात बंदोबस्‍तासाठी पोलिसांची आखणी !

पुणे – संभाव्‍य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून गणेशोत्‍सवात ७ सहस्र पोलिसांचा कडक बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे. पोलीस आयुक्‍त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्‍त संदीप कर्णिक यांच्‍या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्‍त आर्. राजा यांनी बंदोबस्‍ताची आखणी केली आहे.

भाविकांकडील भ्रमणभाष, दागिने यांची चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्‍यासाठी साध्‍या वेशातील पोलीस बंदोबस्‍तासाठी तैनात केले जाणार आहेत. उत्‍सवाच्‍या कालावधीत मानाच्‍या मंडळांसह गर्दीच्‍या ठिकाणची बाँब शोधक नाशक पथकाकडून पडताळणी केली जाणार आहे.

पोलीस आयुक्‍तालयातील ५ सहस्र पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्‍हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागवण्‍यात आलेले १ सहस्र ३०० पोलीस कर्मचारी, १ सहस्र गृहरक्षक दलाचे सैनिक, केंद्रीय सुरक्षा दलाच्‍या ५ तुकड्या बंदोबस्‍तासाठी रहाणार आहेत. बंदोबस्‍तास ‘पोलीस मित्र’ साहाय्‍य करणार आहेत. गर्दीवर शहरातील १ सहस्र ८०० ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ लक्ष ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना मंडपाच्‍या परिसरात ‘सीसीटीव्‍ही कॅमेरे’ बसवण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांवर अद्यापही आतंकवादी आक्रमणाचे सावट असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !