वनौषधी दुर्वा ! : Ganapati

अनलासूर या महाभयंकर राक्षसाच्या आवाजाने पृथ्वी हादरून जायची. त्याच्या डोळ्यांतून आगीच्या ज्वाळा निघत. त्या ज्वाळांमुळे त्याच्यापुढे कुणीही उभे रहात नसे. त्याने देवांना त्रास देण्यात प्रारंभ केला. देवांचेही त्याच्यापुढे काहीही चालेना. देवांनी गणपतीला शरण जायचे ठरवले. त्यांनी त्याचे नामस्मरण करताच गणपति बालरूपात त्यांच्या समोर प्रकट झाला.

गणपति हा अनलासुरासमवेत लढाईसाठी गेला. अनलासुराच्या आगीमुळे गणपतीच्या आजूबाजूचे सर्व जळून भस्म झाले. गणपतीशी त्याची घनघोर लढाई झाली. तो बालरूपी गणपतीला गिळण्यासाठी जवळ गेल्यावर गणपतीनेच त्याला गिळले. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

राक्षसाचा नाश झाला खरा; पण त्याला गिळल्याने गणपतीच्या अंगाची आग होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला. त्याने पाण्यात आंघोळ केली, चंदनाचा लेप लावला; पण तरीही अंगाचा दाह होतच होता. तो काही केल्या थांबेना ! तेव्हा देवांनी गणपतीच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. म्हणून गणपतीला ‘भालचंद्र’ नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ गणपतीला दिले; म्हणून गणपतीला ‘पद्मपाणी’ असे म्हणतात. शंकराने आपला नाग त्याच्या कमरेला बांधला. वरूणाने पाण्याचा अभिषेक केला; पण काही केल्याने दाह थांबेना. शेवटी ऋषिमुनी आले. प्रत्येकाने २१ दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. काय गंमत बघा ! लगेचच गणपतीला बरे वाटले आणि त्याच्या अंगाची लाही शांत झाली.

गणपति म्हणाला, ‘माझ्या अंगाची लाही शांत करण्यासाठी देवांनी उपाय योजिले; परंतु दुर्वांनी अंगाचा दाह न्यून झाला. जो मला दुर्वा अर्पण करील, त्याला सहस्रो यज्ञयाग, व्रते, दाने, तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. या दुर्वा पुष्कळ औषधी आहेत. यांचा रस प्यांल्याने पोटातील दुखणे थांबते.’

– (साभार : ‘सोहम्’, गणेशोत्सव विशेषांक, सप्टेंबर २०१०)