दुर्वांकुराचे माहात्म्य ! : Ganesh

‘एकदा देवांचा दरबार भरला असतांना त्यांच्यात चर्चा झाली की, कुठलीही पूजा करतांना गणपतीचे पूजन प्रथम का होते ? तेव्हा कालिकादेवी म्हणाली, ‘‘गणपति हा सर्वांपेक्षा बुद्धीमान आहे. त्याचे एवढे मोठे डोके बुद्धीमत्ता दर्शवते. त्याची शक्ती मोठी असून तो युक्तीवान आहे. तो ब्रह्मदेवाचा जावई असल्याने ब्रह्मांडात भरून राहिला आहे; म्हणून सर्वांच्या आधी गणेशपूजा करतात. कालिकादेवीचे म्हणणे देवांना पटले; पण गणपतीचे वडील शंकर आणि श्रीविष्णु यांना मात्र राग आला. ते म्हणाले, ‘‘गणपतीने आपण सामर्थ्यवान आहोत, हे सिद्ध करून दाखवावे. ‘त्याचे सामर्थ्य अधिक आहे’, असे वाटले, तरच ‘त्याची पूजा प्रथम करावी’, असे आम्ही म्हणू !’ त्यांनी रव्याचे २१ लाडू आणि तांदळाच्या पिठाचे उकडीचे २१ मोदक भरलेले ताट गणपतीसमोर ठेवले. गणपतीने ओळखले की, शंकर आणि विष्णु परीक्षा पहात आहेत ! त्याने ते २१ लाडू आणि २१ मोदक एका घासात खाल्ले ! (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

शंकर आणि विष्णू सामर्थ्यवान असल्याने त्यांनी सामर्थ्याने ताटातील मोदक आणि लाडू पुन्हा निर्माण केले; पण जेवढे मोदक आणि लाडू ताटात येत, ते सगळे गणपति संपवत असे. शंकर आणि विष्णु थकले; पण गणपतीची भूक थांबत नव्हती. गणपतीने रागाने विचारले, ‘कुठे आहेत तुमचे मोदक आणि लाडू ? बस्स एवढेच दिलेत ? मला आणखी खायचे आहेत.’ मग शंकर आणि विष्णु यांनी कालिकादेवीला विनंती करून गणपतीची समजूत काढायला सांगितली. कालिकादेवीने दुर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवल्या . ती म्हणाली, ‘गणराया, तुला दुर्वा वाहिल्यावर तू संतुष्ट होतोस, मग आता दुर्वेचा अंकुर खा आणि संतुष्ट हो ! शंकर आणि विष्णु या दोघांनाही ‘तुझी प्रथम पूजा करावी’, हे मान्य आहे.’ तेव्हापासून लोक गजाननाला रव्याचे लाडू आणि तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक यांचा नैवेद्य दाखवू लागले.

(साभार : ‘सोहम्’, गणेशोत्सव विशेषांक, सप्टेंबर २०१०)