‘अंगारकी चतुर्थी’चे माहात्म्य ! : Ganesh Chaturthi

पूर्वी भारद्वाज नावाचे महान ऋषी होऊन गेले. त्यांना पृथ्वीपासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा पुत्र उत्पन्न झाला. तो भारद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ ठेवून पृथ्वी निघून गेली. ऋषींनी त्याचे नाव ‘भौम’ ठेवले. त्याचा रंग तांबडा असल्याने लोक त्याला ‘अंगारक भौम’ म्हणू लागले. त्याला ऋषींनी उत्तम शिक्षण देऊन ‘ॐ गँ गणपतये नमः।’ या मंत्राचा जप करण्यास सांगितले. भौमाने नदीकाठी सहस्रो वर्षे गणेशमंत्राचा जप उभ्याने केला. त्याची तपश्चर्या बघून गणपति प्रसन्न झाला. मंगळवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीने प्रत्यक्ष भौमाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

भौम म्हणाला, ‘मला स्वर्गात राहून देवांच्या समवेत अमृतप्राशनाची इच्छा आहे. तसेच ज्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रसन्न होऊन दर्शन दिले, ती संकष्टी चतुर्थी सर्वांना कल्याणकारी ठरो, असे दोन वर तुम्ही मला द्या.’ गणपति म्हणाला, ‘तुला देवांसह अमृतप्राशन करायला मिळेल. तू दुसर्‍या वराच्या रूपाने जगाचे मंगल करायला सांगितलेस; म्हणून लोक मला ‘मंगलमूर्ती’ म्हणतील. तुझे नाव ‘अंगारक’ आहे; म्हणून मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीला लोक ‘अंगारकी चतुर्थी’ संबोधतील. या संकष्टीचे व्रत करणार्‍याला २१ संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य मिळेल.’ गणपतीने भौमास स्वतःत विलीन करून तो अंतर्धान पावला.

(साभार : ‘सोहम्’, गणेशोत्सव विशेषांक, सप्टेंबर २०१०)