श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यास दक्षिण कोरिया इच्छुक !

नवी देहली – दक्षिण कोरियासाठी अयोध्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भारत सरकारने निमंत्रण दिल्यास दक्षिण कोरिया सोहळ्यात सहभागी होईल, असे विधान दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे-बोक यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या संदर्भात केले. चांग जे-बोक पुढे म्हणाले, ‘‘कोरियन पौराणिक कथांनुसार अयोध्या राज्यातील एक भारतीय राजकन्या आपल्या राजकुमाराशी लग्न करण्यासाठी कोरियाला गेली होती. या वेळी त्यांनी सांगितले की, कोरियामध्ये अयोध्येला ‘अयुधा’ म्हणतात. भारत आणि कोरियाचे नाते २ सहस्र वर्षांपेक्षा जुने आहे.’’

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने वर्ष २०१८ मध्ये दिली होती अयोध्येला भेट !

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी किम जंग-सुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून वर्ष २०१८ मध्ये अयोध्येला भेट दिली होती. त्या वर्षी ६ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी अयोध्येत राणी सुररत्नाच्या नवीन स्मारकाचे भूमिपूजन केले होते. ही तीच राणी सुरीरत्ना आहे, जिचा कोरियाच्या राजाशी विवाह झाला होता. राजाशी विवाह झाल्यानंतर तिला राणी हू ह्वांग-ओके म्हणून ओळखले जाऊ लागले.