१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘ज्याप्रमाणे अंधार आणि प्रकाश एका ठिकाणी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे षड्विकार अन् आनंद एका ठिकाणी राहू शकत नाहीत. संत केव्हाही निर्विकार असतात; म्हणून ते सदा आनंदी असतात.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : बोधामृत)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. षड्विकार माणसाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकवत असणे : ‘माणूस जन्माला येतांना स्वत:बरोबर केवळ स्वत:चे प्रारब्ध घेऊन येत असतो. तो जसजसा मोठा होत जातो, तसतसे सहा विकारांपैकी एक एक विकार त्याला चिकटत जातो. हे विकार माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. माणूस भोवतालच्या आर्थिक, तसेच सामाजिक परिस्थितीनुसार वागत जातो. हे विकार हळूहळू माणसावर विजय मिळवतात. माणूस या विकारांच्या आहारी जातो. हे विकार तरी कोणते ?, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू होत. माणूस विकारवश झाला की, ‘आपण कोण आहोत ? आपला जन्म कशासाठी झाला ?’, हे पूर्णपणे विसरून जातो आणि मार्गभ्रष्ट होतो. तो परत परत जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतो. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ (म्हणजे पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू)’, हे संस्कृत वचन काही खोटे नाही. हे सर्व विकार माणसाला जन्म-मृत्यूच्या जाळ्यात पुरते अडकवून टाकतात.
२ आ. संतांच्या सहवासाचे महत्त्व !
२ आ १. संतांच्या सहवासात माणसाला स्वत्वाची जाणीव होणे : जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटायचे असेल, तर माणसाला संतांचा सहवास लाभावा लागतो. संत हे सगळ्यात असून कुठेच नसल्यासारखे असतात. संतांचे जीवन हे पूर्णपणे जगाच्या उपकारासाठी असते. सुख-दुःख त्यांना सम वाटते. इतरांचे दुःख पाहून ते दुःखाने कळवळतात आणि इतरांचे सुख त्यांना आनंद देऊन जाते. संतांच्या सहवासात आल्यावर माणसाला स्वत्वाची जाणीव होते. तो प्रपंचाकडून परमार्थाकडे झुकू लागतो. ‘आपले आणि परके’, असे पुढे काही उरतच नाही. ‘हे विश्वचि माझे घर’, अशा पद्धतीने तो आपले वर्तन सुधारतो.
२ आ २. संतांच्या सहवासाने माणसाला साक्षात्कार होणे आणि त्याच्यापासून विकार दूर गेल्याने तो हळूहळू संतपदाला पोचणे : विकारांच्या मिट्ट अंधारात संत त्या माणसाला सात्त्विकतेची एक पणती देतात. त्या पणतीच्या उजेडात तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागतो. जिथे प्रकाश आहे, तिथे अंधार कसा असेल ? हळूहळू तो सूर्याच्या लख्ख प्रकाशात प्रवेश करतो आणि स्वतःचे आत्मस्वरूप पहातो. त्याला स्वतःचे आत्मस्वरूप दिसताच त्याची एका गतीमान अशा वैश्विक ऊर्जेशी ओळख होते. त्या क्षणी तो ‘शरीर म्हणजे मीच आहे’, हे विसरतो. ‘आपण आणि शरीर भिन्न आहोत’, याची त्याला जाणीव होते. यालाच कुणी ‘साक्षात्कार’ म्हणतात. ही वैश्विक ऊर्जा कुणाला सगुण रूपात दिसते, तर कुणाला निर्गुण स्वरूपात दिसते. सगुण रूप, म्हणजे तो ज्या आराध्य दैवताची उपासना करत असतो, ते आराध्य दैवत अत्यंत तेजोमय अशा अवस्थेत त्याला दिसते. जर निर्गुण अवस्थेत त्याला दर्शन झाले, तर तेजाचा एक मोठा गोळा त्याला त्याच्या डोळ्यांनी बघता येतो. जिथे तेजोमय प्रकाश असतो, तिथे विकारांचा अंधार कसा बरे असणार ? सर्व विकार त्याच्यापासून दूर दूर निघून गेल्याने तोही हळूहळू संतपदाला पोचतो आणि स्वानंदात मग्न होतो.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१०.८.२०२३)