चर्चेची तिसरीफेरी निष्फळ !
जालना – राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य सरकारने अध्यादेशामध्ये दुरुस्ती केल्यावरच मी पाणी पिणार आहे. अध्यादेशात १-२ किरकोळ दुरुस्त्या बाकी आहेत. त्या दुरुस्त होईपर्यंत उपोषण चालूच राहील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
दुसरीकडे ‘जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. तो त्यांनी द्यावा’, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. त्यावर जरांगे यांनी ‘काय वेळ घ्यायचा तो घ्या; मात्र आमच्या मागण्या मान्य करा’, असे उत्तर दिले.
जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलकांवर लाठीमार करणार्या पोलीस अधिकार्यांवर सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ज्या पोलीस अधिकार्यांनी गोळ्या झाडल्या, ते मुंबई येथे शिष्टमंडळासमवेत फिरत आहेत. ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ते अधिकारी आपल्या समोर फिरत आहेत. सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; पण आतापर्यंत एकही कारवाई झाली नाही. भ्याड अमानुष आक्रमण करणार्या पोलीस अधिकार्याला सक्तीच्या रजेवर पाठवत नसतात. त्यांना बडतर्फ करत असतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
‘मराठा आरक्षणाच्या सूत्रावर पुढील २ दिवसांत गोड बातमी मिळणार आहे’, असा दावा अर्जुन खोतकर यांनी केला आहे. ‘मी सरकार आणि आंदोलक यांच्यातील दुवा आहे. कुणीही घाई करू नये. सद्यःस्थितीत आंदोलकांच्या मनासारखे होत नसल्यामुळे गुंता वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहली येथे आहेत. ते परतल्यानंतर या प्रकरणी पुन्हा चर्चा चालू होईल’, असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.