मंत्री, सचिव, कर्मचारी यांची सोय उपाहारगृह आणि विश्रामगृह येथे !
छत्रपती संभाजीनगर – येत्या १७ सप्टेंबर या दिवशी शहरात मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. त्यासाठी मंत्री, सचिव यांच्यासह जवळपास ५०० कर्मचारी येणार आहेत. त्यांच्यासाठी उपाहारगृह आणि विश्रामगृह येथील ५०० खोल्या अन् २०० वाहने यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुभेदारी विश्रामगृहात मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी ‘वॉटरप्रूफ शामियाना’ (पावसापासून वाचण्यासाठीचा मंडप) उभारण्यात येणार आहे.
शासकीय निवासस्थानांमध्ये रहाणारे अधिकारी आणि इतर लोक यांच्यासाठी पिण्याचे पाणी, वीज, शौचालये, तसेच इतर सुविधा चोख ठेवण्याची सूचना विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी दिली आहे. ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयात मंत्रीमंडळाच्या पूर्वसिद्धतेची आढावा बैठक ८ सप्टेंबर या दिवशी घेण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी येणार्या लोकांची व्यवस्था १४ विविध शासकीय निवासस्थानांमध्ये करण्यात येणार आहे.
१७ समित्या नेमल्या !
मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी १७ विविध समित्या सिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समन्वय कक्ष, अर्थ समिती कक्ष, राजशिष्टाचार, वाहतूक व्यवस्था, भोजन, प्रसिद्धी, निवास व्यवस्था, नियंत्रण कक्ष, सुरक्षा पास, स्वागतकक्ष आदींचा समावेश आहे. प्रत्येक समितीत ५ ते १० अधिकार्यांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिका‘राज्यावर कर्जाचा डोंगर असतांनाही लक्षावधी रुपये व्यय करून मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक घेणे आवश्यक आहे का ?’, असा प्रश्न जनतेच्या मनात आल्यास चूक ते काय ? |