जगाच्या अस्तित्वासाठी भारताचे तत्त्वज्ञान आवश्यक !

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग ८

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. जगात अनेक देशांमध्ये परस्परांत शत्रुत्व आहे; पण भारताचे या सर्वांशी चांगले संबंध आहेत. अमेरिका आणि रशिया या दोन बलाढ्य देशांतील शत्रुत्व सर्वज्ञात आहे. हे दोन्ही देश एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. जगात सध्या ‘अमेरिकेशी मित्रत्व, म्हणजे रशियाशी शत्रुत्व’, ‘चीनशी शत्रुत्व, म्हणजे अमेरिकेशी मित्रत्व’, अशी काही समीकरणे बनली आहेत; पण भारत एकाच वेळेस अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी मित्रत्वाचे संबंध राखून आहे; कारण हिंदु तत्त्वज्ञानाला कुणाशीही शत्रुत्व मान्य नाही ! ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे’ अशा प्रकारचे पसायदान हिंदु ईश्‍वराजवळ मागत असतो. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा आमच्या सनातन, म्हणजे हिंदु धर्माचा मूलभूत संस्कार आहे. हिंदु धर्माचे हे घोषवाक्य भारताच्या संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर कोरलेले आहे. कुटुंबात परस्परांविषयी शत्रुत्व कसले ? कुटुंबातील सदस्यांनी परस्परांशी शत्रुत्वाची भावना ठेवली, तर त्याचा सर्वनाश होण्यास कितीसा वेळ लागणार ? त्यामुळे जगाच्या अस्तित्वासाठी आणि कल्याणासाठी जगात हिंदु धर्म अन् हिंदूबहुल भारत यांचे जिवंत रहाणे फार आवश्यक आहे. जगातून कदाचित हिंदु धर्म आणि भारताचे अस्तित्व नष्ट झाले, तर जगातील सेमेटिक धर्मामध्ये स्वतःच्या धर्माच्या वर्चस्वासाठी विश्‍वयुद्ध झाल्याविना रहाणार नाही आणि  त्यात जगाचा पूर्णपणे नाश होईल !

१. भारताच्या भवितव्याचा सूर्य उगवेल ! – योगी अरविंद

थोर देशभक्त योगी अरविंद भारताच्या भूमिकेविषयी म्हणतात, ‘प्राचीन काळीच विकसित झालेला भारत मृतप्रायही झाला नाही वा त्याची सृजनशक्तीही उणावलेली नाही. भारत अजूनही जिवंत आहे. एवढेच नव्हे, तर जगातील मानवतेप्रती त्याला विशिष्ट कर्तव्यही तडीस न्यायचे आहे. भारत विश्‍वगुरु आहे. तो मानवी जीवाला (आत्मा) जडलेल्या व्याधींवर उपचार करणारा वैद्य आहे ! त्याला पुन्हा एकदा जगातील मानवतेला आकार देण्याचे आणि मानवी जीवाला शांती प्रदान करण्याचे कर्तव्य पार पाडायचे आहे. भारताच्या भवितव्याचा सूर्य उगवेल, त्याचा प्रकाश संपूर्ण राष्ट्राला व्यापेल, आशिया खंडाला व्यापेल आणि संपूर्ण जगालाही व्यापून उरेल.’’

श्री. शंकर गो. पांडे

२. भारत जगाची गुरुकिल्ली ! – अर्नाल्ड टॉयन्बी

जगविख्यात इतिहासकार अर्नाल्ड टॉयन्बी भारताविषयी म्हणतात, ‘सर्वार्ंत पहिले आणि महत्त्वाचे सूत्र असे की, भारत जगाची गुरुकिल्ली आहे. इतिहासात नेहमीच त्याने ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजच्या जगाचे सारभूत तत्त्वही भारतच आहे. भारताचा मानवी जीवनाकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन आहे. मानवी व्यवहार संचलित करण्याची एक विशिष्ट परंपरा आहे आणि जगाच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्याची क्षमताही आहे. केवळ भारताच्या अंतर्गत स्थितीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या परिस्थितीतही भारताची ही क्षमता आहे, हे निश्‍चित सत्य आहे.’

३. जगाची स्थिती !

आज मानवाने आपल्या सुखोपभोगांसाठी नैसर्गिक संसाधनांचे अमर्याद शोषण केल्यामुळे नैसर्गिक असंतुलन निर्माण झाले आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणजे वैश्‍विक तापमानातील वृद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कुठे ओला दुष्काळ, तर कुठे कोरडा दुष्काळ, कुठे बर्फ वितळणे, तर कुठे महापूर येणे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे, भूकंप, त्सुनामी, वनांमध्ये आगी लागणे, जगातून पशूपक्षांच्या, वृक्ष-वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होणे, नवनवीन असाध्य रोगांचा संसर्ग होणे या सर्वांमुळे मानवी अस्तित्वच संकटात सापडले आहे. त्यात अमेरिका, चीन, रशिया यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईमुळे लाखो लोक होरपळत आहेत. या महाशक्तींच्या आपापसांतील वैरामुळे अखिल मानवजात संकटात सापडली आहे. तिचा केव्हा विनाश होईल, हे सांगणे कठीण आहे. धर्मांधांच्या आतंकवादी कृत्यांमुळे तर सारे जग त्रस्त आणि भयावह स्थितीत आहे.

४. भारताच्या आध्यात्मिक योगदानाचा विचार जगाने करण्याची वेळ !

अशा भयग्रस्त अवस्थेमध्ये सर्वांसाठी एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे ‘हिंदु’ !, म्हणजेच भारतीय जीवनमूल्यांचा स्वीकार करणे. भारतीय जीवनमूल्यांचा स्वीकार केला, तर आणि तरच मानव अन् सृष्टीचे अस्तित्व शेष राहील. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या मानवजातीसमोर दुसरा अन्य पर्याय नाही. ‘आहार निद्रा भय मैथुनंच’, या पशूवत् जीवनापेक्षा काही उच्च जीवन आदर्श मानवजातीने आपल्यासमोर ठेवल्याविना त्याची या सर्व संकटांतून मुक्ती होणे शक्य नाही आणि हा उच्च जीवन आदर्श भारताविना अन्य कोणताही देश देऊ शकत नाही. भारताच्या आध्यात्मिक योगदानाचा विचार सगळ्या जगानेच करण्याची वेळ आता आली आहे.

५. जगाकडून भारतियांची शाश्‍वत जीवनमूल्ये अंगीकारण्यास आरंभ !

सुदैवाने पाश्‍चात्त्य देशातील अनेकांना भारतियांची शाश्‍वत जीवनमूल्ये हळूहळू पटू लागली असून त्यांचा स्वीकार त्यांच्याकडून होऊ लागला आहे. ख्रिस्ती समाज बुद्धीवादी आणि मुसलमान समाजाइतका झापडबंध वृत्तीचा नाही. योग्य असेल त्याला मान्यता देणे, त्याचा स्वीकार करणे एवढा विवेक ख्रिस्ती देशांमध्ये दिसून येतो. हिंदु धर्मातील देवतांचा, तत्त्वज्ञानाचा, संस्कृत भाषा आणि संस्कार यांचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती देशांमध्ये होत आहे. जगाने भारताचा योग आणि आयुर्वेद स्वीकारला आहे. भारतीय आहार, विहार आणि जीवनशैलीही जगाकडून स्वीकारली जात आहे. ‘परस्परांचा आदर करून, एकमेकांचे अस्तित्व मान्य करून सर्वांनी एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे रहाणे यातच स्वतःचे आणि जगाचे कल्याण आहे’, हे हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान संपूर्ण जग मान्य करू लागले आहे. त्यामुळे अनेक पाश्‍चात्त्य देशांत हिंदु मंदिरांचे आणि मंदिरात येणार्‍या अन्य पंथियांचे प्रमाण वाढू लागले आहे. ‘हिंदु धर्मातील तत्त्वज्ञानाचे आणि जीवनशैलीचे पालन केले, तरच सर्व जग सुखी अन् समृद्ध होईल’, हे वास्तव सर्व जगालाच जेव्हा कळेल, तो दिवस सर्व जगासाठीच सुदिन असेल ! असा दिवस लवकरात लवकर उजाडो, हीच प्रार्थना आपण सर्व हिंदूंनी ईश्‍वरचरणी करूया.

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.