उलट-सुलट कसेही वाचले, तरी सारखाच अर्थ रहाणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ (पॅलिंड्रोम) !

१. ‘पॅलिंड्रोम’ म्हणजे काय ?

‘पॅलिंड्रोम’ (Palindrome) म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार, वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी उलट-सुलट कशीही वाचली, तरी सारखीच रहाते (शेवटाकडून आरंभाकडे वाचत गेेले, तरी पालटत नाही) मराठीत त्याला ‘विलोमपद’ म्हणतात.

२. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीमध्ये ‘पॅलिंड्रोम’ अल्प असणे

इंग्रजीत ‘पॅलिंड्रोम’ची संख्या शेकड्याने आहे; पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. लहानपणी तर २-३ च ठाऊक होते, उदा.

अ. चिमा काय कामाची

आ. ती होडी जाडी होती.

इ. रामाला भाला मारा.

३. मराठीत विलोमपदे (पॅलिंड्रोम) देणारे ‘अँड्राईड अ‍ॅप’

अलीकडे कळले, ‘मराठीत ‘पॅलिंड्रोम’ला ‘विलोमपद’ असा शब्द आहे.’ मराठीतील विलोमपदे देणारे एक ‘अँड्राईड अ‍ॅप’ (‘Marathi Palindromes’- भ्रमणभाषवर वापरण्यात येणारा अनुप्रयोग) आहे. ‘हे आश्‍चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे’, असे वाटते.

४. मराठीतील विलोमपदे

अ. टेप आणा आपटे.

आ. तो कवी ईशाला शाई विकतो.

इ. भाऊ तळ्यात ऊभा.

ई. शिवाजी लढेल जीवाशी.

उ. सर जाताना प्या ना ताजा रस.

ऊ. हाच तो चहा

वा, वा ! ही काही मराठी ‘पॅलिंड्रोम्स’, म्हणजे विलोमपदे वाचून मजा आली. आणखी काही विलोमपदे (पॅलिनड्रोम्स) कुणाला ठाऊक आहेत का ?

५. ‘विलोमपदा’द्वारे केलेली श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची संस्कृतमधील स्तुती

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ।
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम् ॥

या श्‍लोकामध्ये पहिल्या चरणात श्रीरामाची आणि दुसर्‍या चरणात श्रीकृष्णाची स्तुती आहे. या श्‍लोकाचे वैशिष्ट्य असे की, यातील दुसरे चरण पहिल्या चरणाच्या उलट्या क्रमात आहे.

(वरील श्‍लोकातील पहिले चरण तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः ।

श्रीरामपक्षी अन्वयार्थ : ‘सीतेची सुटका करणार्‍या, गंभीर हास्य असणार्‍या, भव्य अवतार असणार्‍या आणि ज्याच्यापासून सर्वत्र दया अन् शोभा प्राप्त होतात, अशाला (त्या श्रीरामचंद्राला) मी वंदन करतो.

श्‍लोकातील द्वितीय चरण

श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम् ॥

श्रीकृष्णपक्षी अन्वयार्थ : भव्य प्रभा असणार्‍या, सूर्य आणि जलमय चंद्र यांचाही जो देव त्याला, संहार करणार्‍या (पुतने)लाही मुक्ती देणार्‍या आणि सृष्टीला प्राणभूत असणार्‍या त्या यदुनंदनाला मी वंदन करतो.)’

(संदर्भ : सामाजिक माध्यम)