अनेक मासांनंतर विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठका होणार

गोवा विधानसभा

पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या सरकारच्या आश्‍वासनांवर आधारित ‘आश्‍वासन’ समिती आणि ‘इस्टीमेट्स’ समिती यांच्या बैठका प्रदीर्घ कालावधीनंतर आता होणार आहेत. जानेवारी २०२३ मध्ये मडगावचे भाजपचे आमदार दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेची ‘इस्टीमेट्स’ समिती स्थापन करण्यात आली, तर कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली ‘आश्‍वासन’ समितीची स्थापना करण्यात आली होती; मात्र समित्यांची स्थापना झाल्यानंतर त्यांची आजपर्यंत एकही बैठक झालेली नाही. ‘इस्टीमेट्स’ समिती आणि आश्‍वासन समिती यांच्या अनुक्रमे ७ सप्टेंबर अन् १४ सप्टेंबर या दिवशी बैठका होणार आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे.

नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर विरोधी सदस्यांच्या समित्यांची एकही बैठक झाली नाही

विधानसभेच्या ‘पीएसी’ (पब्लिक अकाऊंट्स कमिटी) आणि ‘पीयुसी’ (पब्लिक अंडरटेकिंग कमिटी) या समित्यांवर अनुक्रमे एल्टन डिकोस्ता अन् विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची नियुक्ती झाल्यानंतर या समित्यांची मागील ८ मासांत एकही बैठक झालेली नाही. विरोधी पक्ष सरकारच्या कामकाजावर आपली देखरेख असल्याचा दावा करत असले, तरी ‘पीएसी’ आणि ‘पीयुसी’ यांच्या बैठका अजूनही झालेल्या नाहीत. ‘पीएसी’ आणि ‘पीयुसी’ यांचा अहवाल वर्ष २०१४ पासून अजूनही विधानसभेत मांडण्यात आलेला नाही. वास्तविक ‘पीएसी’ आणि ‘पीयुसी’ यांचा अहवाल ‘कॅग’च्या अहवालावरून सिद्ध करण्यात येतो आणि विरोधकांसाठी हे अहवाल विधानसभेत सरकारला प्रश्‍न विचारण्यासाठी उपयुक्त असतात. प्राप्त माहितीनुसार श्री गणेशचतुर्थीपूर्वी किंवा नंतर ‘पीएसी’ आणि ‘पीयुसी’ यांच्या बैठका होण्याची शक्यता आहे; मात्र यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.