सातारा, ६ सप्टेंबर (वार्ता.) – शासनाने लादलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध म्हणून शिक्षकदिनी शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापन केले. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला. ‘नवसाक्षर’ अभियानाच्या सर्वेक्षणासह अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामातून शिक्षकांना मुक्त करा. ‘शिक्षकांचे प्रथम कर्तव्य विद्यार्थ्यांना शिकवणे, हे असून ते पूर्ण करू द्या’, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक करत आहेत.
अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामांतून मुक्त करावे ! – बलवंत पाटील, शिक्षक नेते
या आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट करतांना शिक्षक नेते बलवंत पाटील म्हणाले, ‘‘शिक्षकदिन हा शिक्षकांसाठी पवित्र दिवस आहे; मात्र अशैक्षणिक कामांच्या भडीमाराने वैतागलेल्या गुरुजन वर्गाला काळ्या फिती लावून अध्यापन करणे हाच पर्याय शिल्लक राहिला आहे. निवडणूक, जनगणना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या शासकीय कर्तव्यपालनात बळजोरीने शिक्षक काम करत आहेत. दिवसेंदिवस शिक्षकांना अतिरिक्त कामांचा भार दिला जात आहे. त्यामुळे विद्यादानाच्या मूळ कर्तव्यपालनामध्ये दोष निर्माण होत आहेत. शिक्षक हेही मनुष्यच असून त्यांच्याही मानसिक ताणतणावाचा विचार झाला पाहिजे. शासनाने याची गांभीर्याने नोंद घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामातून मुक्त करायला हवे.’’
संपादकीय भूमिकाअसा निषेध शिक्षकांना का करावा लागत आहे ? प्रशासन स्वतःहून शिक्षकांची समस्या जाणून त्यावर योग्य उपायययोजना का काढत नाही ? |