त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक असून ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते लेहमधील ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’चे भूमीपूजन

मुंबई – लेहमधील कारू येथे ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’च्‍या कामाचे भूमीपूजन महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले. ३ कोटी रुपये खर्च करून हे संग्रहालय उभारण्‍यात येत असून हा निधी महाराष्‍ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला, तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्‍ट्र जोडला गेला, हे आमचे भाग्‍य आहे. त्रिशूळ हे उत्‍पत्ती, स्‍थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक आहे. ‘त्रिशूळ डिव्‍हिजन’नेही असेच शौर्य कायम दाखवले आहे. जेथे श्‍वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्‍ही पराक्रम गाजवत आहात. आम्‍ही तुमच्‍या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्‍मान वाढवण्‍यात सैन्‍याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्‍यात त्रिशूळ डिवीजनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले. १४ कोर कमांडर लेफ्‍टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी.के. मिश्रा आणि भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय या वेळी उपस्‍थित होते.

मुंबईवर २६/११ चे आक्रमण झाले, त्‍या वेळी एन्.एस्.जी. तुकडीचे नेतृत्‍व करणारे कर्नल सुनील शेओरन यांचीही या कार्यक्रमाला उपस्‍थिती होती. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांची भेट घेतली. कर्नल सुनील शेओरन यांचा ‘बुलेट कॅचर’ म्‍हणून उल्लेख केला जातो. त्‍यांच्‍या कामगिरीचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांच्‍या भाषणात केला.

या वेळी बोलतांना उपमुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, आज भारत सर्व क्षेत्रांत प्रगती करत आहे. चंद्रयान ३ मोहीम यशस्‍वी झाल्‍यावर आता भारताने सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. अनुमाने वर्षभरापूर्वी ‘त्रिशूळ युद्ध संग्रहालया’ची संकल्‍पना उदयास आली होती. महाराष्‍ट्रातील अधिवक्‍ता मीनल भोसले आणि सारिका मल्‍होत्रा या २ महिलांनी या भागात भेट दिली, तेव्‍हा या संकल्‍पनेचा उदय झाला. त्‍यांनी श्रीकांत भारतीय यांच्‍या कानावर हा विषय टाकला आणि त्‍यांनी देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यानंतर यासाठीचे आर्थिक साहाय्‍य देण्‍याचा निर्णय मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकारने घेतला.

कसे असेल त्रिशूळ संग्रहालय ?

त्रिशूळ युद्ध स्‍मारकानजीक हे संग्रहालय उभारण्‍यात येत असून ते त्रिशुळाच्‍या आकाराप्रमाणे असणार आहे. यात ३ प्रदर्शन कक्ष असणार असून त्‍यात वर्ष १९६२, वर्ष १९६५, वर्ष १९७१, वर्ष १९९१ आणि अगदी अलीकडच्‍या काळात झालेल्‍या कारवायांमधील धारातीर्थी पडलेल्‍यांच्‍या स्‍मृती असणार आहेत. हे त्रिशूळ डिवीजन साहसी सैनिकांचे असून एकीकडे पाकिस्‍तान, तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्‍या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषाणशिल्‍प, या त्रिशूळ डिवीजनच्‍या स्‍थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्‍ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्‍त्र, दारूगोळा, वाहने, संपर्क व्‍यवस्‍था, सैनिकांच्‍या कुटुंबियांशी केलेला पत्रव्‍यवहार इत्‍यादी गोष्‍टी असणार आहेत. वर्ष १९६२ च्‍या युद्धकाळात या डिवीजनची स्‍थापना करण्‍यात आली होती. आतापर्यंत १५० वीरता पुरस्‍कार या डिवीजनला मिळालेले आहेत.