गणेशोत्सव मिरवणुकीस अनुमती देण्यास टाळाटाळ करून पोलिसांनी गुन्हे नोंदवले ! – महेश उत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते

पत्रकार परिषदेत डावीकडून प्रशांत नार्वेकर, नियाज खान, महेश उत्तुरे, रवीकिरण गवळी

कोल्हापूर – शहरात ‘वाय.पी. पोवारनगर मित्रमंडळ’, ‘प्लॅटिनम ग्रुप’च्या वतीने ३ सप्टेंबरला श्री गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या अनुमतीसाठी मंडळाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधीकारी यांच्याकडे ३० ऑगस्टला रितसर लेखी आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते. या संदर्भात वाहतूक शाखेकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जबाब घेण्यात आला. यानंतर कार्यालयाकडून अनुमती देण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात अनुमती मागण्यासाठी गेल्यावर हे कार्यालय बंद होते. यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला अनुमती नसल्याचेही अथवा अन्य काहीही कळवण्यात आले नाही, तर गणेशोत्सव मिरवणुकीस अनुमती देण्यास टाळाटाळ करून पोलिसांनी थेट गुन्हे नोंद केले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री. महेश उत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेसाठी ‘प्लॅटिनम ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष नियाज खान, रवीकिरण गवळी, दीपक उंडाळे, गणेश कल्याणकर यांसह अन्य उपस्थित होते.

श्री. महेश उत्तुरे पुढे म्हणाले, ‘‘पोलिसांना जर आम्हाला अनुमती द्यावयाची नव्हती, तर त्यांनी तसे कळवणे अपेक्षित होते; मात्र तसे काहीच झाले नाही. मिरवणूक चालू असतांना पोलीस आमच्या समवेत होते, तेव्हाही आम्हाला काही सांगितले नाही. या मिरवणुकीत सहभागी असणार्‍या ढोल-ताशा पथकांवरही पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. पारंपरिक पद्धतीच्या वापरातील ढोल-ताशे पथकांवरही गुन्हे नोंद केल्याचे कदाचित् हे भारतातील पहिलेच उदाहरण असेल. पोलीस प्रशासन असेच वागणार असेल, तर प्रशासन भविष्यात हिंदूंचे धार्मिक सण साजरे करू देणार आहे कि नाही ?’’

या संदर्भात नियाज खान म्हणाले, ‘‘या मिरवणुकीतून या मार्गावर असणार्‍या वाहतुकीस जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा मंडळाचा कोणताही हेतू नव्हता. मूर्तीची उंची अधिक असल्याने विजेच्या तारा अडकण्याची शक्यता असल्याने मिरवणुकीची गती अल्प झाली. हा मार्ग ‘सायलेंन्स झोन आहे’, असे पोलीस प्रशासन नंतर आम्हाला सांगत आहे; मात्र यावर तशी माहिती देणारा कोणताही फलक रस्त्यावर नाही. आम्ही मिरवणूक काढली, तो दिवस हा रविवार असून सुटीचा दिवस असल्याने कोणत्याही शाळेला त्रास झालेला नाही. गेली १० वर्षे आम्ही याच मार्गावरून मिरवणूक काढत असून आमची विसर्जन मिरवणूक ही टाळ्या वाजवत पारंपरिक मार्गाने काढली जाते. तरी मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त यांच्या भावना विचारात घेता आमच्यावर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.’’

संपादकीय भूमिका

प्रशासन भविष्यात हिंदूंना धार्मिक सण साजरे करू देणार आहे कि नाही ?