बनावट तुकडीद्वारे शासकीय अनुदान घेण्याचा प्रयत्न !

भोसरी येथील ‘सु.ना. बारसे माध्यमिक विद्यालया’तील प्रकार

पुणे – बनावट तुकडी सिद्ध करून सरकारी अनुदान घेण्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. या प्रकरणी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिलीप थोरे, भोसरी येथील सु.ना. बारसे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे आणि संस्था व्यवस्थापक यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी उपशिक्षणाधिकारी अनंत दाणी यांनी तक्रार दिली होती. (असे शिक्षक असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे ‘बारसे माध्यमिक विद्यालया’तील इ. ८ वी आणि इ. ९ वीच्या तुकडी अनुदानाविषयी तक्रार आली होती. चौकशी समितीच्या अहवालामध्ये ‘बारसे महाविद्यालयास कोणत्याही तुकड्यांचे वाटप झालेले नसतांनाही उपशिक्षणाधिकारी थोरे यांनी स्वाक्षरीने मान्यता दिली, तर प्रभारी मुख्याध्यापकांनी ३ कर्मचार्‍यांना विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकार्‍यांकडे पाठवला होता’, असे निष्पन्न झाले आहे.