पूर्णवेळ साधना करू लागल्‍यावर गुरुकृपेने कुटुंबियांच्‍या परिस्‍थितीत झालेले सकारात्‍मक पालट

१. पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेणे

कु. मृणाल धर्मे

‘वर्ष २०२१ मध्‍ये मी नोकरी करत होते. नोकरीमुळे मला सेवा करता येत नव्‍हती, तसेच मला मानसिक त्रासही पुष्‍कळ व्‍हायचा; म्‍हणून मी नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतला. तेव्‍हा आई-बाबांना पुष्‍कळदा वाटायचे, ‘माझ्‍या पगाराच्‍या पैशांतून घरचा व्‍यय चालतो; म्‍हणून मी नोकरी सोडू नये.’

२. पूर्णवेळ साधना चालू केल्‍यावर साधिकेच्‍या अधिवक्‍ता असलेल्‍या भावाला पूर्वीपेक्षा अधिक कामे मिळणे

‘आपण देवाकडे १ पाऊल टाकले, तर देव आपल्‍याकडे १० पावले टाकतो’, या सुविचाराचे मला सदैव स्‍मरण व्‍हायचे. मी आश्रमात पूर्णवेळ साधना चालू केल्‍यावर अधिवक्‍ता असलेल्‍या माझ्‍या भावाला अधिक कामे मिळू लागली आणि व्‍यवसायात चांगला जम बसला. हे सर्व परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने झाले.

३. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावरील श्रद्धेमुळे पूर्णवेळ साधना चालू केल्‍यावर घरच्‍यांचा विरोध न्‍यून होणे

माझे बाबा वारकरी संप्रदायानुसार साधना करत होते. त्‍यांना सनातन संस्‍थेचे कार्य फारसे पटत नव्‍हते. त्‍यामुळे आई-बाबांना वाटायचे, ‘मी घरी राहून सेवा आणि साधना करावी.’ यामुळे आमच्‍या घरी पुष्‍कळ संघर्ष व्‍हायचा, तरीही मी पूर्णवेळ साधना करण्‍याच्‍या निर्णयावर ठाम होते. ‘माझे गुरुदेव माझ्‍या घरच्‍यांची सर्व काळजी घेणार आहेत’, याची मला शाश्‍वती होती. त्‍यामुळे घरच्‍यांचा विरोध हळूहळू न्‍यून झाला.

४. सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी अर्पण मिळवण्‍याविषयी केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेचे वडील सेवेत सहभागी होणे

वर्ष २०२२ च्‍या मकरसंक्रांती पासून ते रथसप्‍तमीपर्यंत धान्‍य अर्पणात मिळवण्‍याची सेवा चालू झाली. त्‍या वेळी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांचा धान्‍य अर्पण मिळवण्‍याच्‍या संदर्भातील सत्‍संग बाबांनी ओझरता ऐकला होता. त्‍या सत्‍संगात सद़्‍गुरु स्‍वातीताई म्‍हणाल्‍या, ‘‘आपण समाजातील लोकांकडून घ्‍यायला जात नाही, तर द्यायला जातोय.’’ ते वाक्‍य बाबांच्‍या अंतर्मनावर बिंबले. त्‍या वर्षी बाबा धान्‍य अर्पणात मिळवण्‍याच्‍या सेवेत स्‍वतःहून सहभागी झाले. हा सर्व पालट सद़्‍गुरु स्‍वातीताई आणि परात्‍पर गुरुदेव यांच्‍यामुळे झाला.

५. आई-वडिलांनी साधिकेला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेची सेवा करण्‍यास सहजपणे अनुमती देणे

डिसेंबर २०२२ मध्‍ये मी गडहिंग्‍लज (जि. कोल्‍हापूर) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या सेवेला गेले होते. तेव्‍हा बाबा आईला म्‍हणायचे, ‘‘तिला एवढ्या लांब कशाला पाठवलेस ?’’ तेव्‍हा आईने बाबांना सांगितले, ‘‘ती गुरुदेवांच्‍या सेवेला गेली आहे, तर तिथे देव तिची काळजी घेणारच आहे.’’ या विचाराने आई-बाबा दोघेही निर्धास्‍त झाले. तेव्‍हा आई-बाबांनी मला घरी येण्‍याचा आग्रह केला नाही. या कालावधीत सोलापूर आणि सांगली या दोन जिल्‍ह्यांचा समष्‍टी सत्‍संग पू. दीपाली मतकर प्रतिदिन घ्‍यायच्‍या. या सत्‍संगामुळे आईच्‍या स्‍वभावामध्‍ये पुष्‍कळ पालट झाले. एकदा आई भ्रमणभाषवर पू. ताईंशी बोलतांना म्‍हणाली, ‘‘मी मुलीला गुरुदेवांना अर्पण केले आहे.’’ या वाक्‍याचे मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली. ‘हे सर्व देवच करतो’, याची जाणीव झाली.

६. साधिकेच्‍या वडिलांना झालेल्‍या अपघाताच्‍या वेळी ‘ते परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या नावाचा जप करत असल्‍याने त्‍यांचे रक्षण झाले’, असे जाणवणे

८.४.२०२३ या दिवशी माझे बाबा दुचाकीवरून शेताकडे जात असतांना त्‍यांच्‍या गाडीला मोठा अपघात झाला. त्‍या वेळी गाडीचे पुढचे ‘हॅन्‍डल’ पूर्णपणे वाकडे झाले, तसेच पुढून येणार्‍या चारचाकीचे पुढील ‘बॉनेट’ही वाकले. त्‍या वेळी बाबांचा ‘प.पू. डॉक्‍टर’ असा नामजप चालू असल्‍याने त्‍यांना काहीच दुखापत झाली नाही. त्‍यांना साधे खरचटलेही नाही. त्‍या वेळी ‘कुणी तरी अलगद उचलून बाजूला ठेवले’ असे त्‍यांना जाणवले. बाबांनी मला संध्‍याकाळी भ्रमणभाष करून याविषयी सांगितले. तेव्‍हा त्‍यांची भावजागृती झाली, तसेच ‘‘तू रामनाथी आश्रमात आहेस; म्‍हणून माझा जीव वाचला’’, असे सांगतांना त्‍यांना परात्‍पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.

परात्‍पर गुरुदेवांनी माझ्‍या जीवनात आमूलाग्र पालट केला, तसेच वरील लिखाणही त्‍यांनीच करून घेतले. त्‍याबद्दल कृतज्ञता !’

– कु. मृणाल धर्मे (वय २५ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (११.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक