‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला ‘शिवाई’पासून ७ दिवसांत ६ लाखांचे उत्पन्न !

पुणे-कोल्हापूर मार्गावर धावणारी ‘शिवाई’ बस

कोल्हापूर, १ सप्टेंबर (वार्ता.) – राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत. प्रतिदिन कोल्हापूर मुख्य बसस्थानकातून पहाटे ५, सकाळी ६, ७, ८, ९ आणि दुपारी २, ३, ४ अन् सायंकाळी ५, ६ अशा वेळेत १० फेर्‍या उपलब्ध आहेत. विनाथांबा, प्रदूषणविरहित, वातानुकूलित, आवाज विरहित आणि अत्याधुनिक असलेल्या या बसला प्रवाशांची पहिली पसंती आहे. २५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘शिवाई’ला ६ लाख १५ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लवकरच आणखी काही गाड्या कोल्हापूर विभागाला प्राप्त होणार आहेत.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने राबवले जाणारे विविध धार्मिक क्षेत्रांचे मार्ग

या बसला प्रतिप्रवासी ५०० रुपये शुल्क असून महिलांकडून ५० टक्के म्हणजे २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. केवळ ४ ते ४.३० घंटे एवढ्या अल्प कालावधीत ही बस पुणे येथे पोचते. तसेच पुण्यावरूनही कोल्हापूरसाठी ‘शिवाई’च्या फेर्‍या चालू आहेत.

विविध विशेष धार्मिक यात्रांमधून ३० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न !

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने राबवले जाणारे विविध धार्मिक क्षेत्रांचे मार्ग

कोल्हापूर आगाराच्या वतीने नियमित विशेष धार्मिक यात्रांसाठी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात ‘श्री दत्त दर्शन’ अंतर्गत औदुंबर, नृसिंहवाडी, खिद्रापूर, आळते या मार्गावर प्रतिप्रवासी ४०० रुपये आकारण्यात येतात. ही बस प्रत्येक गुरुवार, रविवार आणि पौर्णिमेला धावते. ‘११ मारुति दर्शन’ ही एक विशेष बस असून ती मनपाडळे, जुने पारगाव, शिराळा, बहे बोरगाव, शहापूर, मसूर, चाफळ, शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज या मार्गावर धावते. ही बस प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी उपलब्ध असून त्यासाठी ५०० रुपये प्रतिप्रवासी आकारण्यात येतात. कोल्हापूर येथे दत्तभक्तांची संख्या पुष्कळ आहे. त्यांच्यासाठी कोल्हापूर, गाणगापूर, अक्कलकोट (मुक्काम), तुळजापूर, पंढरपूर आणि कोल्हापूर या मार्गावर प्रतिप्रवासी १ सहस्र ३५० रुपये देऊन ही गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार सोडण्यात येते.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने राबवले जाणारे विविध धार्मिक क्षेत्रांचे मार्ग

या सर्व यात्रांमध्ये १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘११ मारुति’ या मार्गावर २३० हून अधिक फेर्‍या झाल्या असून २७ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.  वरील सर्व यात्रांचे ३० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. लवकरच भाविकांसाठी कोल्हापूर आगाराच्या वतीने ‘अष्टविनायक दर्शन’ ही बसही चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थानकप्रमुख श्री. अनिल सुतार यांनी दिली.