मुंबईत गणेशोत्‍सवात ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपक वापरण्‍यास अनुमती !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – यावर्षी गणेशोत्‍सवात केवळ ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपकाचा वापर करण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांनी अनुमती दिली आहे. त्‍यामुळे सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीने तीव्र अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली आहे. ‘प्रतिवर्षी गणेशोत्‍सवात ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्‍वनीक्षेपकाचा वापर करण्‍यास अनुमती देण्‍यात येते. यावर्षी ५ व्‍या दिवशी गौरी-गणपति यांच्‍या मूर्तींचे विसर्जन होणार असून १ दिवस अल्‍प करण्‍यात आला आहे. पुण्‍यात ५ दिवसांची अनुमती दिली असतांना मुंबईवर मात्र अन्‍याय करण्‍यात आला आहे. ‘मुंबईविषयी दुजाभाव न करता १ दिवस वाढवून द्यावा’, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीने केली आहे.