जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताचे नाव उज्‍ज्‍वल करणारा प्रज्ञानंद !

अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरले. असे असले, तरी प्रज्ञानंद हा उपविजेता म्‍हणजेच जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू ठरतो. या स्‍पर्धेमध्‍ये प्रज्ञानंद याच्‍यापेक्षा अनुभवाची मोठी शिदोरीही असलेल्‍या बुद्धीबळपटूंना त्‍याने अंगी असणारे उपजत कौशल्‍य आणि आतापर्यंत घेतलेले कष्‍ट यांद्वारे मात केले. अशा या प्रज्ञानंदची माहिती देणारा लेख देत आहोत.

प्रज्ञानंद

१. प्रज्ञानंद आणि त्‍याचे कुटुंब यांच्‍याविषयीची माहिती

प्रज्ञानंदचा जन्‍म १० ऑगस्‍ट २००५ या दिवशी चेन्‍नई येथील पाडी येथे झाला. त्‍याचे पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असे आहे. त्‍याचे टोपणनाव नाव ‘प्रज्ञा’ आहे. वडिलांचे नाव रमेशबाबू असून ते बँकेत नोकरी करतात. त्‍याच्‍या आईचे नाव नागलक्ष्मी असून त्‍या गृहिणी आहेत. प्रज्ञानंदला एक मोठी बहीण असून तिचे नाव वैशाली रमेशबाबू असे आहे. तीसुद्धा बुद्धीबळपटू आहे. प्रज्ञानंद भारतीय बुद्धीबळ चॅम्‍पियन विश्‍वनाथन आनंद यांना आदर्श मानतो.

२. प्रज्ञानंदने आतापर्यंत मिळवलेले यश

अ. वयाच्‍या ७ व्‍या वर्षी त्‍याने ‘फिडे मास्‍टर’ ही पदवी मिळवली होती.

आ. वर्ष २०१३ मध्‍ये प्रज्ञानंदने ८ वर्षांखालील जागतिक युवा बुद्धीबळ स्‍पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

इ. वर्ष २०१५ मध्‍ये त्‍याने १० वर्षांखालील विजेतेपद पटकावले होते. वर्ष २०१६ मध्‍ये तो १० वर्षे, १० मास आणि १९ दिवसांचा असतांना त्‍याने इतिहासातील सर्वांत लहान ‘आंतरराष्‍ट्रीय मास्‍टर बुद्धीबळपटू’ बनला होता. तेव्‍हापासून त्‍याची विजयाची वाटचाल चालू झाली. दोन वर्षांनंतर १२ व्‍या वर्षी प्रज्ञानंद रशियन बुद्धीबळ स्‍टार सेर्गेई करजाकिननंतरचा सर्वांत लहान ‘ग्रँडमास्‍टर’ बनला.

ई. २३ जून २०१८ या दिवशी इटलीमध्‍ये पार पडलेल्‍या ‘ग्रेडाइन ओपन’मध्‍ये प्रज्ञानंदने १२ वर्षांचा असतांना तिसरे ‘ग्रँडमास्‍टर’ विजेतेपद मिळवले. या वयात ‘ग्रँडमास्‍टर’ पुरस्‍कार जिंकणारा दुसरा सर्वांत लहान बुद्धीबळपटू ठरला.

उ. १२ ऑक्‍टोबर २०१९ या दिवशी प्रज्ञानंदने १८ वर्षाखालील विभागात ‘जागतिक युवा चॅम्‍पियनशिप’ जिंकली.

ऊ. फेब्रुवारी २०२२ मध्‍ये ‘एअरथिंग्‍ज मास्‍टर्स’च्‍या ८ व्‍या फेरीत त्‍याने जागतिक बुद्धीबळ चॅम्‍पियन मॅग्‍नस कार्लसनचा पराभव करून इतिहास रचला आहे. ‘ग्रँडमास्‍टर’ची पदवी मिळवणारा तो अभिमन्‍यू मिश्रा, गुकेश डी, सर्गेई करजाकिन आणि जावोखिर सिंदारोव यांच्‍या नंतरचा ५ वा सर्वांत लहान बुद्धीबळपटू आहे.

३. प्रज्ञानंद सामाजिक माध्‍यमांपासून रहातो दूर !

‘ई.एस्.पी.एन्.’ वाहिनीच्‍या वृत्तानुसार प्रज्ञानंद सामाजिक माध्‍यमांपासून (सोशल मिडिया) पूर्णपणे दूर आहे. त्‍याचे प्रशिक्षक आर्.बी. रमेश यांच्‍या मते तो सामाजिक माध्‍यमांपासून दूर राहिल्‍याने तो त्‍याच्‍या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. इतरांच्‍या स्‍तुतीने भारावून जाणे किंवा विचलित होणे या सगळ्‍यांपासून दूर रहाण्‍यास साहाय्‍य होते. प्रज्ञानंद सामाजिक माध्‍यमांवर फारसा सक्रीय नसला, तरी त्‍याला ‘फॉलो’ (अनुनय) करणार्‍यांची संख्‍या लाखोंच्‍या संख्‍येत आहे.

४. प्रज्ञानंदच्‍या घरची आर्थिक परिस्‍थिती नाजूक

प्रज्ञानंदच्‍या घरची आर्थिक परिस्‍थिती पुष्‍कळ नाजूक आहे. त्‍याच्‍या वडिलांनी सांगितले, ‘‘आमची आर्थिक परिस्‍थिती अशी होती की, मोठ्या मुलीला बुद्धबळाच्‍या शिकवणीला पाठवणे आणि त्‍यासाठी पैसे देणेही आम्‍हाला कठीण होते. जेव्‍हा प्रज्ञानंदनेही  बुद्धीबळात रस दाखवला आणि त्‍याच क्षेत्रात पुढे जाण्‍याचे ठरवले, तेव्‍हा मला अन् माझ्‍या पत्नीला त्‍याला बुद्धीबळासाठी पाठवणे परवडणारे नव्‍हते.

५. प्रज्ञानंदविषयी प्रशिक्षक आर्.बी. रमेश यांचे मत

‘‘कधी कधी अपेक्षांचे ओझे प्रज्ञानंदवर येऊ शकते. खेळ म्‍हटला की, त्‍यात जय पराजय आलाच; पण जेव्‍हा तो हरतो, तेव्‍हा कधी कधी त्‍याच्‍यावर पाहिजे त्‍यापेक्षा अधिक परिणाम होतो. अशा स्‍थितीतही तो स्‍वतःला स्‍थिर आणि आनंदी ठेवू शकेल, यावर तो चिंतन करत असतो अन् त्‍यासाठी तसे प्रयत्नही करतो’’, असे त्‍याचे प्रशिक्षक आर्.बी. रमेश यांनी सांगितले.

(साभार : विविध संकेतस्‍थळे)