शक्‍ती आणि बालकल्‍याण पुरस्‍कारांसाठी ३१ ऑगस्‍टपर्यंत अर्ज करण्‍याची मुदत !

मुंबई – केंद्रशासनाच्‍या महिला आणि बाल विकास विभागाकडून देशातील शौर्यवान आणि खिळाडू वृत्तीच्‍या बालकांचा ‘शक्‍ती’ आणि ‘बालकल्‍याण’ पुरस्‍कार देऊन गौरव करण्‍यात येतो. या पुरस्‍कारासाठी केंद्रशासनाकडून अर्ज मागवण्‍यात आले आहेत. ३१ ऑगस्‍टपर्यंत ‘www.awards.gov.in’ या संकेतस्‍थळाद्वारे हे अर्ज स्‍वीकारले जाणार आहेत.

मुंबई उपनगरचे जिल्‍हा महिला आणि बालविकास अधिकारी बी.एच्.नागरगोजे यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन केले आहे. शिक्षण, कला, सांस्‍कृतिक कार्य, खेळ नाविन्‍यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्‍या मुलांना ‘शक्‍ती पुरस्‍कार’ दिला जातो. बाल कल्‍याण पुरस्‍कार मुलांचा विकास, संरक्षण आणि कल्‍याण या क्षेत्रात कोणत्‍याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता सेवाभावनेतून कार्य करणार्‍यांना दिला जातो. या पुरस्‍कारासाठी किमान ७ वर्षे अशा प्रकारे काम करणे आवश्‍यक आहे. वैयक्‍तिक आणि संस्‍था स्‍तरावरही हा पुरस्‍कार दिला जातो. यासाठी बालकल्‍याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्‍यपूर्ण उत्‍कृष्‍ट कार्य असणे अपेक्षित आहे. या पुरस्‍कारांसाठी वयोमर्यादा ५-१८ वर्षांपर्यंत असणे आवश्‍यक आहे.