प्रेमभाव आणि अनेक गुणांचा समुच्‍चय असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय १० वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन ही या पिढीतील एक आहे !

‘२१.८.२०२३ या दिवशी, म्‍हणजेच श्रावण शुक्‍ल पंचमीला (नागपंचमीला) कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय १० वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिच्‍यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

(‘वर्ष २०२१ मध्‍ये कु. वेदश्री भुकन हिची आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के होती आणि आता वर्ष २०२३ मध्‍येही तिची आध्‍यात्‍मिक पातळी ६५ टक्‍के आहे.’ – संकलक)

सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’  

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. वेदश्री भुकन

कु. वेदश्री रामेश्‍वर भुकन हिला १० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. सौ. उर्मिला भुकन (कु. वेदश्रीची आई),  सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

सौ. उर्मिला भुकन

१ अ. प्रेमभाव

१ अ १. आश्रमातील रुग्‍णाईत साधकांची काळजी घेणे आणि त्‍यांना तत्‍परतेने साहाय्‍य करणे : ‘मी वैद्यकीय सेवेत असते. ज्‍या वेळी एखादा रुग्‍णाईत साधक उपचारासाठी येतो, त्‍या वेळी वेदश्री तिथे बसलेली असेल, तर लगेच आसंदीवरून उठून त्‍यांना बसायला आसंदी देते. त्‍यांची पुष्‍कळ प्रेमाने विचारपूस करते. त्‍यांना औषध घ्‍यायला पाणी हवे असेल, तर लगेच तिच्‍या बाटलीतील पाणी देते. रुग्‍णाईत साधक तिला जे साहाय्‍य मागतील, ती त्‍यांना लगेच तत्‍परतेने करते. तिला त्‍यांच्‍याविषयी पुष्‍कळ प्रेम वाटते. त्‍यामुळे अनेक साधक म्‍हणतात की, ‘वेदश्री पुष्‍कळच प्रेमळ आहे. ती किती चांगली आहे. एवढी लहान असतांनाही पुष्‍कळ प्रेमाने इतरांची काळजी घेते.’

१ अ २. आश्रमातील बालसाधकांना मोठ्या बहिणीच्‍या मायेने सांभाळणे : ती आश्रमातील तिच्‍यापेक्षा वयाने लहान असणार्‍या बालसाधकांना पुष्‍कळ प्रेमाने सांभाळते. कुणाशीही तिचे मतभेद होत नाहीत. ती बालसाधकांना समजून घेते. ती त्‍यांना तिच्‍याकडील खाऊ देते. त्‍यांची मोठ्या बहिणीप्रमाणे काळजी घेते. कुणी बालसाधक चुकत असेल, तर ती त्‍यांना प्रेमाने समजून सांगते. त्‍या वेळी ‘इतरांना प्रेमाने चूक कशी सांगावी ?’, हे मला तिच्‍याकडून शिकायला मिळते.

१ आ. ऐकण्‍याच्‍या वृत्तीत वाढ होणे : वेदश्रीमध्‍ये पूर्वीच्‍या तुलनेत ऐकण्‍याची वृत्ती वाढली आहे. मी तिला सांगितलेली कुठलीही सेवा असो कि काही सुधारणा असो, ती लगेच ऐकते आणि त्‍याप्रमाणे कृती करते. तिला व्‍यष्‍टी साधनेच्‍या प्रयत्नांची आठवण करून दिल्‍यावर ती लगेचच कृती करते.

१ इ. स्‍वीकारण्‍याच्‍या वृत्तीत वाढ होणे : ती सेवा करतांना सहसाधकांना ‘माझ्‍या काही चुका जाणवल्‍या का ?’, असे विचारते. तेव्‍हा साधक तिला तिच्‍याकडून झालेल्‍या काही चुका लक्षात आणून देतात. तेव्‍हा ती त्‍या तत्‍परतेने स्‍वीकारते आणि त्‍यांची क्षमा मागून चुका सुधारण्‍यासाठी प्रयत्न करते. पूर्वी ती तिच्‍या चुकांवर स्‍पष्‍टीकरण द्यायची. आता ती प्रथम चूक स्‍वीकारते आणि मग ‘तिला काय वाटते ?’, ते सांगते.

१ ई. व्‍यष्‍टीचे प्रयत्न नियमित आणि गांभीर्याने करणे : वेदश्री चुकांचे लेखन (सारणीलिखाण) नियमित करते आणि स्‍वतःकडून झालेली चूक नियमित फळ्‍यावर लिहिते. ती समष्‍टीत चूक सांगून क्षमायाचना करते आणि नियमित स्‍वयंसूचना सत्र करते. ती नामजप नियमित १ घंटा, तर कधी २ घंटे करते. ती दैवी सत्‍संगात सांगितलेले प्रयत्नही करते. ती लहान असूनही व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न करते.

१ उ. संतांचे आज्ञापालन : वेदश्रीला हिंदी भाषेत बोलायला जमायचे नाही. त्‍या वेळी तिला एका सत्‍संगात परात्‍पर गुरुदेव म्‍हणाले, ‘‘तू हिंदीत बोलणे शिकून घे’’, असे सांगितल्‍यावर तिने त्‍यावर प्रयत्न चालू केले.

त्‍याच वेळी आश्रमात एक देहलीच्‍या साधिका आल्‍या होत्‍या. तिने त्‍यांच्‍याशी ओळख करून घेतली आणि त्‍यांना सांगितले, ‘‘तुम्‍ही माझ्‍याशी हिंदी भाषेतून बोलत जा आणि मीही हिंदीतून तुमच्‍याशी बोलेन. माझे काही चुकले की, तुम्‍ही मला त्‍यातील सुधारणा सांगा. आपण महाप्रसादाच्‍या वेळेत एकत्र येऊन एकमेकींशी बोलत जाऊ.’’ वेदश्रीने गुरुदेवांनी सांगितल्‍यामुळे तळमळीने हिंदी बोलणे शिकून घेतले.

१ ऊ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वेदश्रीविषयी काढलेले उद़्‍गार : एकदा मी आणि वेदश्री श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंकडे गेलो होतो. तेव्‍हा त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘वेदश्रीसारखी दैवी बालिका तुमच्‍या पोटी जन्‍मली; म्‍हणून तुम्‍ही किती भाग्‍यवान आहात ! तुम्‍ही तिची काहीही काळजी करू नका. ती देवाची आहे.’’

वेदश्रीला आश्रमरूपी आई घडवत आहे. गुरुदेवांनी तिला समष्‍टीत ठेवल्‍यामुळे ती घडत आहे. वेदश्रीला गुरुमाऊली पुढे पुढे घेऊन चालली आहे, त्‍याविषयी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. ‘हे कृपाळू गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आम्‍हा सर्व साधकांवर तुमची अनंत कृपा राहू दे. आमच्‍याकडून शेवटच्‍या क्षणापर्यंत साधना करून घ्‍या, अशी तुमच्‍या परम पवित्र चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

२. श्री. रामेश्‍वर भुकन (कु. वेदश्रीचे बाबा), नगर सेवाकेंद्र

श्री. रामेश्वर भुकन

२ अ. मनावर ताण आलेला असतांना बोलल्‍यानंतर ताण अल्‍प होणे : ‘मला एखाद्या प्रसंगाचा ताण आला असेल किंवा मनाची चिडचिड होत असेल, त्‍या वेळी मी वेदश्री समवेत भ्रमणभाषवर बोलतो. तेव्‍हा ‘तिच्‍याशी बोलतांना माझ्‍या मनावर आलेला ताण अल्‍प होऊन मन हलके झालेले असते’, हे माझ्‍या लक्षात येते.

२ आ. साधनेचे पुष्‍कळ चांगले प्रयत्न करणे : जेव्‍हा वेदश्री तिचे काही प्रसंग मला सांगते किंवा तिच्‍या आईकडून कळतात, तेव्‍हा ‘त्‍या प्रसंगांमध्‍ये योग्‍य काय असायला हवे ?’, असे वेदश्रीला विचारल्‍यावर ती मला ‘त्‍यावर योग्‍य काय’, ते सांगते आणि मी सांगितलेलेसुद्धा लगेच स्‍वीकारून प्रयत्न चालू करते. त्‍या वेळी मलासुद्धा आश्‍चर्य वाटते की, ‘ती एवढी लहान असूनही तिला एवढे छान प्रयत्न कसे काय जमतात ! तेव्‍हा लक्षात येते की, ‘वेदश्री ही गुरुदेवांचे बाळ आहे.’

२ इ. ग्रंथवाचन काही दिवसांत पूर्ण करणे : या वर्षी झालेल्‍या वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये वेदश्री समवेत एका हिंदुत्‍वनिष्‍ठांना मी काही ग्रंथ देत असतांना वेदश्रीने ‘निष्‍काम कर्मयोगी भीष्‍म’, हा नवीन ग्रंथ घेऊन देण्‍यासाठी हट्ट केला. मी तिला तो ग्रंथ घेऊन दिल्‍यावर तिला पुष्‍कळ आनंद झाला. तिने तो ग्रंथ काही दिवसांतच पूर्ण वाचला. त्‍यातून मला शिकायला मिळाले की, ‘माझेही ग्रंथवाचन वेदश्रीप्रमाणे झाले पाहिजे.’

२ ई. वेदश्री पूर्वी बाजारात गेल्‍यावर काही वस्‍तूंसाठी आग्रह करायची; पण आता तो आग्रह अल्‍प झाला आहे.

गुरुदेवांच्‍या अनंत कृपेमुळे वेदश्रीसारख्‍या दैवी बालिकेकडून मला शिकायला मिळत आहे. त्‍याविषयी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी अल्‍पच आहे.’

२ उ. कु. वेदश्रीमध्‍ये मध्‍यम स्‍वरूपात असणारे स्‍वभावदोष : आळस, खाण्‍यात आवड-नावड असणे

३. श्रीमती इंदुबाई भुकन (वेदश्रीच्‍या आजी (वडिलांची आई), आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीमती इंदुबाई भुकन

३ अ. इतरांची काळजी घेणे : ‘पू. लोखंडेआजी (कु. वेदश्रीची पणजी) यांना बरे नसल्‍यास वेदश्री सतत त्‍यांच्‍याकडे लक्ष देते. त्‍यांनी औषधे आणि पाणी असे काहीही मागितले, तर ती लगेच आणून देते. ती त्‍यांना हाताला धरून प्रसाधनगृहात घेऊन जाते.

३ आ. एकाग्रतेने नामजप करणे : पूर्वी तिला जप करण्‍यासाठी बसण्‍यास सांगावे लागायचे; पण आता मी जपाला बसले की, ती लगेच येऊन नामजपाला बसते. पूर्वीपेक्षा नामजप स्‍थिर बसून करते. दिवसभरात मध्‍ये मध्‍ये ‘स्‍वभावदोष निर्मूलन’ सत्र करते.

३ इ. सतत आनंदी असणे : कु. वेदश्री सतत आनंदी दिसते. प्रत्‍येक सत्‍संगात गुरुदेव तिला म्‍हणतात, ‘तू एवढी सतत आनंदी कशी असते ?’

‘हे गुरुमाऊली, वेदश्रीला साधनेत तुम्‍हीच पुढे पुढे घेऊन जा, अशी तुमच्‍या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १६.८.२०२३)