गोवा : मडगाव येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री 

मडगाव-पणजी महामार्गावर राष्ट्रध्वजाची विक्री करतांना विक्रेता

मडगाव, ११ ऑगस्ट (वार्ता.) – १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मडगाव येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करण्यास बंदी आहे, तरीही ध्वजसंहितेचे सर्रास उल्लंघन करून त्यांची विक्री केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस मात्र याविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

राष्ट्रध्वजाचा मान राखून आपली राष्ट्रभक्ती सतत तेवत ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. दुसर्‍या बाजूला व्यावसायिक लाभासाठी बंदी असलेले आणि ध्वजसंहितेचे उल्लंघन करणारे राष्ट्रध्वज बाजारात आणून त्यांचा अवमान केला जात असल्याचे दिसून येते. मडगाव शहरात, रस्त्यांच्या बाजूला, वाहतूक बेट, महामार्गाच्या बाजूला मोठ्या संख्येने  लहान मुले, महिला, पुरुष प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकतांना दिसत आहेत. यावर्षी ही संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.

संपादकीय भूमिका

ध्वजसंहितेचे उल्लंघन करून उघडपणे होणारी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री न रोखणारे निष्क्रीय पोलीस आणि प्रशासन !