१. ‘फेंगशुई’मध्ये सतत निरनिराळे प्रयोग करावे लागणे
१ अ. प्रत्येक २ वर्षांनी पालट करण्यास सांगितले जाणे : ‘फेंगशुई’मध्ये निश्चित स्वरूपाचे नियम किंवा निश्चित स्वरूपाची उत्तरे नाहीत, तसेच कायमची निर्णयात्मक रचना नाही. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, घर, वर्ष, क्रमांक याप्रमाणे सर्व सतत पालटणारी रचना. या वर्षी केलेल्या रचनेचे लाभ दोन वर्षांनी मिळणार नाहीत, म्हणजे २ वर्षांनी पुन्हा रचनेत पालट करा. म्हणजे चित्रे, फर्निचर, आरसे, डेकोरेशन, दारांची रचना, पार्टिशन्स इत्यादी सर्वांमध्ये पुन्हा पालट करा. प्रत्येक २ वर्षांनी सर्व पालटावयास लावणारे कसले हे शास्त्र ! आणि ‘पुन्हा घरांतील सर्व व्यक्तींना सारखाच लाभ मिळेल’, असेही नाही. सतत प्रयोग करत रहा.
१ आ. सतत पालट करूनही कोणताच लाभ झाला नाही, तर परत आरंभीचीच रचना करण्यास सांगणे : चिनी वास्तूशास्त्राप्रमाणे पालट करा. त्यामुळे काही भेद जाणवला नाही, तर ३ आठवड्यानंतर दुसर्या प्रकारची रचना करा. या रचनेमुळे काही वाईट अनुभव आले, तर पुन्हा पहिल्यासारखी रचना करा. पुन्हा ३ आठवडे थांबा. काही भेद जाणवला नाही, तर परत रचना करा आणि जर पहिल्यापेक्षा कसलाही भेद जाणवला नाही, तर तुमच्या घरात आरंभीला जशी रचना होती, तशी करून सुखाने रहा. या शास्त्रामध्ये काहीही समुपदेश (सल्ला) दिला आहे.
२. भारतीय वास्तूशास्त्रामध्ये निश्चित नियम असणे
भारतीय वास्तूशास्त्रामध्ये निश्चित नियम आहेत. हे नियम कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला आणि घराला सारखेच लागू आहेत. पुन्हा पुन्हा रचनेत पालट करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ‘चांगले अथवा वाईट परिणाम कशामुळे होतात ?’, हेही स्पष्टपणे सांगितलेले आहे. व्यय (खर्च) करायचा असल्यास एकदाच करा. प्रत्येक २ वर्षांनी व्यय करण्याची आवश्यकता नाही. भारतीय वास्तूशास्त्राच्या नियमाप्रमाणे रचना केल्यास लाभ होईल; परंतु हानी १०० टक्के नाही.
३. चिनी वास्तूशास्त्रामध्ये त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जात असणे
चित्रविचित्र वस्तूंची विक्री ही ‘फेंगशुई’ची प्रमुखता आहे. चिनी वास्तूशास्त्रामध्ये जी ‘स्वतःला तज्ञ’ असे म्हणवणारी मंडळी आहेत, ती नेहमी निरनिराळ्या वस्तू वापरावयास सांगतात आणि त्या वस्तू त्यांच्याकडे नेहमी उपलब्ध असतात. त्या वस्तूंची विक्री करणे, हा ‘फेंगशुई’मधील प्रमुख भाग आहे. हे गिर्हाईकांनी माल घ्यावा; म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांचे मन वळवण्यासाठी वापरलेली युक्ती असते’ (It has become a marekting gimmick), असे हाँगकाँगमधीलच एका ‘फेंगशुई’ तज्ञाचे स्पष्ट मत आहे.
४. विविध वस्तू भरमसाठ किमतींना विकल्या जात असणे
काही वर्षांपूर्वी २० – २५ रुपयांस मिळणार्या पितळी पोकळ नळ्यांचे किणकिण आवाज करणारे ‘विंडचाईम’ची आता ८५ ते ४५० रुपयांस विकू लागले आहेत. तीन पायांचा तोंडात नाणे असलेला बेडूक, काचेचे म्हणजे ‘क्रिस्टल’चे निरनिराळ्या आकाराचे ठोकळे, चिनी नाणी इत्यादींची भरमसाठ किंमत लावून त्या वस्तू विकणे, हाच प्रमुख व्यवसाय बनला आहे.
५. ‘फेंगशुई’तज्ञ १५ ते २० दिवसांत सिद्ध कसे होतात ?
कोणत्याही शास्त्राची पूर्ण माहिती मिळण्यासाठी बरेचसे ज्ञान मिळवण्याकरता पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. सतत त्याचाच ध्यास घ्यावा लागतो. असे असल्याविना त्या विषयाचे ज्ञान आत्मसात् करता येत नाही. ‘शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशी पंचतारांकित ‘हॉटेल’मध्ये जाऊन काही दिवस या विषयावर माहिती घेणे, म्हणजे या विषयाचे तज्ञ होणे नव्हे’, असे एका प्रसिद्ध ‘फेंगशुईतज्ञा’चे स्पष्ट मत आहे. ‘३ सहस्रांपासून १० सहस्र रुपयांपर्यंत पैसे व्यय करून प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मिळाले, म्हणजे आपण ‘फेंगशुई’तज्ञ झालो, असे आहे; परंतु दुर्दैवाने प्रत्यक्षात असे घडत नाही. पुष्कळ ठिकाणी आस्थापने आणि समाज यांची हानी झाली आहे’, असे पाश्चात्त्य ‘फेंगशुईतज्ञा’ने लिहिले आहे.
आपल्या भारतात कोणत्याही ‘फेंगशुईतज्ञाच्या विज्ञापनांत तो काय काय आणि कोणकोणत्या वस्तू विकतो ?’, याचेच विज्ञापन प्रथम असते. मासिकात लेख लिहिला, तरी त्यामध्येसुद्धा ‘या वस्तू माझ्याकडे उपलब्ध आहेत’, हे वाक्य महत्त्वाचे असते.
६. एका ‘फेंगशुई’तज्ञ म्हणवणार्या महिलेने ‘फेंंगशुई’च्या तोडग्यांमध्ये भारतीय वास्तूशास्त्रासंबंधीचे उपाय सांगितलेले असणे
६ अ. ‘फेंंगशुई’च्या तोडग्यांमध्ये नंदादीप, रांगोळी आणि त्रिशूळ यांचा अंतर्भाव केलेला असणे : सध्या ‘फेंगशुई’संबंधी म्हणजे चिनी वास्तूशास्त्रासंबंधी लिखाण आणि जाहिरात इतकी जोरदार आहे की, एका ‘फेंगशुई’तज्ञ म्हणवणार्या महिलेने लिहिलेल्या लेखात चक्र, नंदादीप, त्रिशूळ, रांगोळी इत्यादी उपाय सुचवले आहेत. ‘चिनी वास्तूशात्रातील भाग्यवान बनण्याचे २५ सोनेरी मार्ग’, या मथळ्याचा लेख त्या महिलेने लिहिला. त्या लेखाखाली ठळक अक्षरांत चौकटीमध्ये विज्ञापन दिले होते. विज्ञापनामध्ये निरनिराळ्या वस्तूंची सूची आणि ‘या सर्व वस्तू माझ्याकडे विकत मिळतात’, हेही लिहिलेले होते.
त्या ‘फेंगशुई’तज्ञ म्हणवणार्या महिलेने जे उपाय सुचवले आहेत, त्या २५ उपायांपैकी १४ उपाय शुद्ध भारतीय आहेत. मी भ्रमणभाष करून त्या बाईंना विचारले, ‘‘चिनी लोक त्रिशूळ, रांगोळी, नंदादीप इत्यादींचा उपयोग कधीपासून करू लागले ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी ‘फेंगशुई’चा ‘कोर्स’ केला आहे. मी लिहिलेले योग्य आहे.’’ आता यावर मी काय बोलणार ? माझ्याकडे जी ‘फेंगशुई’ची परदेशातील तज्ञ व्यक्तींनी लिहिलेली २७ पुस्तके आहेत, ती पुन्हा वाचून पाहिली; परंतु मला काही अजून नंदादीप, त्रिशूळ आणि रांगोळी यांचा उल्लेख आढळला नाही. ‘लोकांना भ्रमात टाकणे’, हाच एक यात उद्देश, अन्य काही नाही.
६ आ. छिद्र असणारे नाणे (भोकाचा पैसा) अथवा बेडूक का नको ?
६ आ १. ऐश्वर्यसंपन्न श्री महालक्ष्मी केवळ चिनी नाण्यांवरतीच प्रसन्न का ? : ज्या निरनिराळ्या वस्तूंचा उपयोग चिनी वास्तूशास्त्रात केला जातो, त्यामध्ये म्हणे, ‘चिनी नाणी एका लाल दोर्यात ओवून त्याचा उपयोग करा, म्हणजे आर्थिक भरभराट होते.’ मी संभ्रमात पडलो की, ‘ऐश्वर्यसंपन्न श्री महालक्ष्मी केवळ चिनी नाण्यांवरतीच प्रसन्न का ? आपल्याकडे पूर्वी तांब्याचे छिद्र असणारे नाणे (भोकाचे पैसे) होते. अजूनही काही लोकांकडे ती सापडतील.
६ आ २. भारतीय अशा चिनी वस्तूंवर पैसे व्यय करून ती वापरत असणे; मात्र त्यांच्यात आपल्याच देवतांची पूजा करण्याची मानसिकता नसणे : एका फेंगशुईतज्ञाला विचारले, ‘‘तांब्याच्या छिद्र असणार्या नाण्यांचा उपयोग केला, तर चालेल का ?’’ त्यावर तो मला म्हणाला, ‘‘नाही. ती चिनी नाणीच लागतात; कारण माहिती नाही; पण आमच्या ‘मास्टर’ने असे सांगायला सांगितले आहे.’’ म्हणजे मुळात श्री लक्ष्मी आणि कुबेर ही आमच्या भारतातील ऐश्वर्य संपन्नतेची दैवते आहेत; पण त्यांची पूजा अन् प्रतिमा घरात ठेवून तिची पूजा करायला आपल्या लोकांना वेळ नाही; परंतु महागडी चिनी नाणी विकत घेऊन ती लाल दोर्यात ओवायला वेळ आहे; कारण चिनी नाणी म्हणे, धन देतात !
६ इ. तोंडात नाणी असलेला महागडा बेडूक पूजणे; मात्र घरात जिवंत बेडूक आल्यास त्याला मारण्याची मानसिकता असणे : तीन पायांचा तोंडात नाणी असलेला बेडूक दीड सहस्र रुपयांना विकत घेऊन तो बेडूक आपले लोक टेबलावर दिमाखाने ठेवणार; कारण काय, तर तो म्हणे, आर्थिक भरभराट करतो; परंतु आपल्या बंगल्याच्या आवारातून उड्या मारत एखादा बेडूक दिवाणखान्यात आला, तर त्याला मात्र काठीने घालवणार किंवा मारायला धावणार. किती विपर्यास आहे हा ! वास्तविक अजूनही खेडेगावात सुसंस्कृत घरांमध्ये संध्याकाळच्या वेळी बेडूक घरात उड्या मारत आला, तर ‘लक्ष्मी आली, कुंकू द्या’, असे म्हणून त्या घरातील बायका त्या बेडकावर कुंकू टाकतात; परंतु त्याला आपण अंधश्रद्धा म्हणून प्रहार करणार ! आपल्या वागण्यामध्ये केवढी ही विसंगती !
(क्रमश: सोमवारच्या दैनिकात)
– अधिवक्ता अरविंद वझे
(साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, मे २००४)