‘वर्ष १९९३ पासून मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करायला आरंभ केला. काही कारणाने मी संस्थेच्या कार्यापासून दूर गेलो. मी प.पू. गुरुदेवांपासून (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापासून) दूर गेलो असलो, तरी त्यांनी माझा हात सोडला नव्हता. त्यांच्या कृपेने पुन्हा मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. आश्रमात आल्यावर मला त्यांच्या दर्शनाची आणि सत्संगाची संधी मिळाली. प.पू. गुरुदेवांच्या सत्संगातून आणि आश्रमात सेवा करतांना मला पुष्कळ शिकायला मिळाले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला पुष्कळ अनुभूतीही आल्या. त्या येथे दिल्या आहेत.
७ ऑगस्ट २०२३ या दिवशीच्या अंकात आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात अनुभवलेली सूत्रे आणि अन्य भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/708713.html
५. श्री. श्रीरंग कुलकर्णी यांना पाहिल्यावर श्रीकृष्णाच्या सवंगड्यांची आठवण होणे
‘हे गुरुदेवा, सकाळी अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद घेतांना साधक श्री. श्रीरंग कुलकर्णी यांची भेट होते. ते अपंग असले, तरी त्यांच्यावर तुमची कृपा आहे. मला त्यांच्यात भगवंताच्या सवंगड्यांचे दर्शन होते. वाकड्या, पेंद्या आणि सुदामा हे श्रीकृष्णाचे सवंगडी सतत त्याच्या संगतीत असायचे.’
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अपार भाव !
६ अ. आनंद आणि चैतन्य यांत जाणवलेला भेद ! : ‘प.पू. गुरुदेव, एकदा पहाटे ४.४५ वाजता मला आपले दर्शन झाले. तेव्हा माझ्यावर प्रीती आणि चैतन्य यांचा जणू वर्षावच झाला. आपण मला म्हणाला, ‘‘आश्रमात कसे वाटते ?’’ मी म्हणालो, ‘‘चैतन्यात आहे.’’ आपण म्हणालात, ‘‘अरे वा !’’ तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. चैतन्य त्रिगुणातीत आहे. चैतन्यामुळे ‘स्व’चा विसर पडतो. चैतन्य साधकाला विश्वमय करते. गुरुदेव, आपल्याच कृपेने आम्ही साधक हे अनुभवत आहोत.
६ आ. चैतन्य आणि आनंद देणारा हिंदु धर्म ! : गुरुदेव, आपण म्हटले होते, ‘जेथे चैतन्य आणि आनंद आहे, तिथेच धर्म आहे अन् हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.’ आपल्या कृपेने आता जगाला याचे आकलन होत आहे. जो विश्वमय करतो, तोच धर्म ! ‘हिंदु धर्म’ विश्वमनाची अनुभूती देतो. गुरुदेव, आपल्याच कृपेने साधक ही अनुभूती घेत आहेत. संतवाणी आहे, ‘चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा’, ते तुम्हीच आहात, गुरुदेव !
६ इ. त्रिगुण असार असून निर्गुण सार असणे आणि ‘सार अन् असार विचार हाच हरिपाठ आहे’, असे संत ज्ञानेश्वरांनी सांगणे : प.पू. गुरुदेव, पर्जन्याने भरलेल्या मेघांना वृक्षरूपी निसर्ग आपल्याकडे बोलावतो. ही वृक्षांची अपेक्षा आहे. गुरुदेव, ‘सात्त्विकता हा गुण निरपेक्ष चैतन्याला आपल्याकडे बोलावतो’, ही सात्त्विकतेची अपेक्षा आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥’, म्हणजे ‘त्रिगुण हे असार, तर निर्गुण हे सार आहे. सार आणि असार यांचा विचार म्हणजे ‘हरिपाठ’ होय.’ त्रिगुण हे सगुणरूप आहेत, तर नाम निर्गुण आहे; म्हणून हरिपाठ हे नाम आहे. प.पू. गुरुदेव, ते भगवंताचे नाम तुम्ही आहात; म्हणून आपल्या चैतन्याचा साधकांना लाभ होत आहे. गुरुदेव, साधकांना आपण त्रिगुणातीत करत आहात. ‘रामसे बडा रामका नाम ।’, ही संतवाणी सार्थ करणारे आपणच आहात, गुरुदेव !
६ ई. पू. सौरभ जोशी यांच्या दर्शनाने आध्यात्मिक लाभ होणे आणि त्यांना पाहून ‘केवळ भावभक्तीवर प्रसन्न होणारा भगवंत परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत’, असे जाणवणे : पू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे संत, वय २६ वर्षे) यांच्या दर्शनाने मला आध्यात्मिक लाभ झाले. ‘त्यांच्या चरणांना स्पर्श करतांना त्यांच्या चरणांतून आनंदाच्या लहरी आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘उंच नीच काही नेणें भगवंत । तिष्ठे भावभक्ति देखोनियां ॥ म्हणजे ‘भगवंत उच्च-नीच आदी काहीही पहात नाही, तर केवळ भावभक्ती पाहूनच तो भक्तापाशी थांबतो.’ ही संतवाणी सार्थ करणारे भगवंत, महाविष्णु नारायण आपणच आहात गुरुदेव ! प.पू. गुरुदेव आपल्या चरणी कृतज्ञता !
६ उ. वेदातील वेद म्हणजे ‘गुरुकृपायोग’ असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तो जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला असणे : एकदा एक साधक मला म्हणाला, ‘‘ऋषींनी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे’ हा केवढा मोठा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे.’’ तेव्हा गुरुकृपेने माझे चिंतन झाले, ‘प.पू. गुरुदेवांचा ‘गुरुकृपायोग’ हा वेदातील वेद आहे. तो त्याच्यातील चैतन्याने जगात सर्वत्र पसरत आहे. तोच मनुष्याला चार वेदांचे अध्ययन करायला प्रवृत्त करत आहे. संतवाणी आहे, ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ।’ (तुकाराम गाथा, अभंग १५०५, ओवी २), म्हणजे ‘संत जगाच्या कल्याणासाठी असतात. ते अन्य लोकांवर उपकार करण्यासाठी स्वतःचा देह कष्टवत असतात.’ प.पू. गुरुदेव, आपणही जगाच्या कल्याणासाठी चैतन्यमय ज्ञान जगात पसरवत आहात.
६ ऊ. विश्वातील सर्व जिवांचा उद्धार करणारे भगवंत परात्पर गुरु डॉ. आठवले ! : संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘चहू वेदी जाण साही शास्त्र कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥’, म्हणजे ‘ज्याचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा प्रयत्न चारी वेद करतात, जो सहा शास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे, त्या हरीचे गुणगान अठरा पुराणे करतात.’ प.पू. गुरुदेव, सप्तलोकांतील जिवांची साधना करून घेणारे आणि सप्तपाताळातील जिवांना मुक्ती देणारे आपणच आहात. वेद, पुराणे किंवा शास्त्रे यांतील ज्ञान कलियुगात समजण्यासाठी अनेक ग्रंथ संकलित करणारे, आपणच आहात गुरुदेव !
६ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांचा नामजप व्हावा’, यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला सांगून ते करून घेणे : गुरुदेव, सर्व ज्ञान नामात आहे; मात्र ते नाम घेणारे अत्यल्प झाले आहेत. नाम होण्यासाठीच आपण साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करायला सांगून ते करूनही घेत आहात; म्हणून साधक भावस्थितीत असतात. ही आम्हा साधकांवरील गुरुकृपाच आहे. प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने पश्यंती आणि परा (टीप) वाणीत नामजप होत असणारे साधक आपल्याकडे आहेत. ते जगात ठिकठिकाणी असूनही ते आपल्या चरणी आहेत. प.पू. गुरुदेव, संत सांगतात, ‘पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥’ (तुकाराम गाथा, अभंग ४२७६, ओवी १), म्हणजे ‘ज्या कुळात आणि देशात हरीचे दास जन्म घेतात, ते कुळ अन् तो देश पवित्र होय.’
टीप- वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा असे वाणीचे ४ प्रकार आहेत. आध्यात्मिक उन्नती होईल, तसा नामजप पुढच्या पुढच्या वाणीतून होतो.
७. दैवी बालकांविषयी असलेला भाव !
७ अ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांच्या पोटी जन्माला येणारे जीवात्मे दैवी बालके असणे : सध्या इतर स्थानांमधील चैतन्य लोप पावले आहे. सनातनचेे साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत. त्यांच्या पोटी जन्माला येणारे जीवात्मे दैवी बालके आहेत. सध्या भारत देशावर रज-तमाचे आवरण आले आहे. त्यामुळेे सर्वत्र स्वार्थ अनुभवण्यास मिळत आहे; मात्र गुरुकृपेने ही दैवी बालके ते रज-तमाचे आवरण दूर करतील. ती पृथ्वीवर सर्वत्र वसंत ऋतु, चैत्र मास किंवा रोहिणी नक्षत्र यांतील वातावरणाप्रमाणे आनंद आणि चैतन्य फुलवतील.
७ आ. आश्रमातील दैवी बालके बोलत असतांना आपली कौतुकाने भरलेली आणि प्रीतीमय मुद्रा सांगत होती, ‘हीच ती हिंदु राष्ट्र चालवणारी दैवी बालके आहेत.’
८. अनुभूती
८ अ. आश्रमातील चैतन्याने साधकांवरील आवरण दूर झाल्यावर ध्यानमंदिरातील धुरकट दिसणारी देवतांची चित्रे तेजस्वी दिसू लागणे : मी मुंबईहून रामनाथी आश्रमात आल्यानंतर दुसर्या दिवसापासून ध्यानमंंदिरात नामजपासाठी बसत होतो. तेव्हा ‘मला ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे धुरकट दिसत होती. ‘ती स्वच्छ करायला पाहिजेत; पण ‘चित्रांची प्रतिदिन पूजा-अर्चा, आरती होते, तर साधक ती स्वच्छ करतच असतील’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर काही दिवसांनी सकाळी ९.३० वाजता मी ध्यानमंदिरात नामजपाला बसलो होतो. तेव्हा देवतांच्या चित्रांकडे पहातांना मला ती चित्रे पुष्कळ तेजस्वी दिसली. तेव्हा माझ्या मनात ‘आज मला चित्रे तेजस्वी का दिसत आहेत ?’, असा विचार आला. त्यावर चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मी मुंबईहून आल्यामुळे माझ्यावर पुष्कळ आवरण होते. त्यामुळे मला देवतांची चित्रे धुरकट दिसत होती. आश्रमातील चैतन्यमय वातावरणाने प्रतिदिन ते आवरण न्यून होत जाऊन नष्ट झाले. त्यामुळे आता मला देवतांची चित्रे तेजस्वी दिसत आहेत.’
८ आ. आगाशीत शतपावली घालतांना हनुमंताचे सूक्ष्मातून दर्शन होऊन ‘तो आश्रमाचे रक्षण करत आहे’, असे दिसणे : प.पू. डॉक्टर, मी आगाशीत शतपावली करत होतो. तेव्हा आश्रमाच्या उत्तरेला दिसणार्या निसर्गाच्या रूपाकडे पहातांना मला आपल्या व्यापकरूपाचे दर्शन झाले. ‘हनुमंत गदा घेऊन आश्रमाच्या चारही बाजूंनी पहारा देत आहे’, असेही मला सूक्ष्मातून दिसले. आपल्याच कृपेने मला त्याचे सहज दर्शन घडले.
८ इ. आश्रमातील ध्यानमंदिराच्या समोरील औदुंबराच्या फांद्या ध्यानमंदिराकडे झुकलेल्या दिसणे आणि ‘ती झाडे निर्गुणाकडे जात आहेत’, असे वाटून त्यांच्याकडे पहातांना शांत वाटणे : आश्रमाच्या पहिल्या माळ्यावरून जाता-येता औदुंबराच्या झाडांकडे लक्ष जाते आणि आपोआप हात जोडले जातात. फांद्यांकडे पहातांना ‘ती झाडे निर्गुणाकडे चालली आहेत’, असे वाटते. त्यांच्याकडे पाहून शांत वाटते. ती झाडे आश्रमाच्या मध्यभागी असून ‘त्यांच्या फांद्या वर न जाता आश्रमाच्या ध्यानमंदिराकडे झुकल्या असून औदुंबरातील चैतन्याचा लाभ आश्रमाच्या सर्व बाजूंना होत आहे’, असे मला वाटले.’ तेव्हा माझ्याकडून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
‘गुरुदेव, माझ्यात भाव निर्माण करणारे आपणच आहात. प.पू. गुरुदेव, तुम्ही सगुण आणि निर्गुण आहात. तुम्हीच आनंदही आहात आणि चैतन्यही आहात. आम्ही साधक प्रकृतीत आहोत, तर तुम्ही शून्यात आहात. गुरुदेव, तुम्ही आहात; म्हणून आम्ही आहोत. गुरुदेव, कृतज्ञ आहे !’
(समाप्त)
– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर (मुंबई)
|