वेंगुर्ला (सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) येथे पाकिस्तानी नागरिकाच्या नावे ८५ गुंठे भूमी

शत्रू राष्ट्राची मालमत्ता म्हणून भारत सरकारने घेतली कह्यात !

वेंगुर्ला – पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या लोकांची भारतातील मालमत्ता कह्यात घेऊन त्यांच्या विक्रीची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने चालू केली आहे. अशा मालमत्तांना ‘शत्रू मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अशी ८५ गुंठे भूमी आढळली असून ती पाकिस्तानी नागरिकांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मालमत्तेची मोजणी करून शासनाने ती कह्यात घेतली आहे.

(सौजन्य : Kokansad Live)

मूळ भारतीय असलेल्या काही नागरिकांनी पाकिस्तानमध्ये गेल्यावर तेथील नागरिकत्व स्वीकारले आहे. अशांच्या मालमत्ता भारतात आहेत. या मालमत्तांमधून त्यांना बेदखल करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे आणि त्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने चालू केली आहे.

महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या एका व्यक्तीची वेंगुर्ला तालुक्यात अंदाजे ८५ गुंठे भूमी असल्याचे उघड झाले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर कागदोपत्री तपासणी करण्यात आली. सध्या या भूमीवर आंबा आणि काजू कलमांची लागवड आहे. शासनाने या भूमीवरील झाडांचा लिलाव केला असून या भूमीच्या भोवती तारेचे कुंपण घालण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने ही भूमी कह्यात घेतल्यानंतर ७/१२ वर भारत शासनाचे नाव आले आहे.