बांदोडा (गोवा) येथील श्री महालक्ष्मी संस्थानच्या वतीने ‘चातुर्मास संवाद’ कार्यक्रम
बांदोडा, २५ जुलै (वार्ता.) – देशातील काही राज्यांमध्ये असलेला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ हा बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या विरोधात आहे; मात्र ‘लव्ह जिहाद’मध्ये प्रेमाच्या नावाने बुद्धीभेद करून मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून त्यांना आखाती देशांत पाठवून त्यांचे शोषण केले जाते. ‘लव्ह जिहाद’द्वारे होणारे धर्मांतर बळजोरीने होणार्या धर्मांतरापेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात घातक आहे. आज युरोपीय संघ, इंग्लंड आदी स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. भारत हा उच्च स्तरावरील वारसा लाभलेला एक देश आहे. युरोपीय संघ किंवा इंग्लंड यांची स्थिती पाहून आम्ही आताच सावध होऊन भारतीयत्व जपले नाही, तर त्याला पुष्कळ उशीर होईल, असे आवाहन ‘द केरल स्टोरी’चे दिग्दर्शक श्री. सुदीप्तो सेन यांनी केले. बांदोडा येथील श्री महालक्ष्मी संस्थानच्या वतीने ‘चातुर्मास संवाद’ कार्यक्रमात २३ जुलै या दिवशी सायंकाळच्या सत्रात दिग्दर्शक श्री. सुदीप्तो सेन बोलत होते. या कार्यक्रमात सूत्रनिवेदिका सौ. शेफाली वैद्य यांनी दिग्दर्शक श्री. सुदीप्तो सेन यांच्याशी संवाद साधला.
दिग्दर्शक श्री. सुदीप्तो सेन यांनी कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी जीवनात लहानपणापासून अनुभवलेले अनेक दुःखदायक प्रसंग, लहानपणी ‘साम्यवादा’चा प्रभाव असल्याने भारतीय संस्कृतीचे शिक्षण कधीच न मिळणे अशा अनेक विषयांची माहिती दिली. दिग्दर्शक श्री. सुदीप्तो सेन यांनी दिलेल्या उत्तरांचा गोषवारा येथे देत आहोत.
केरळमधील सरकारने दक्षिण केरळमधील पर्यटन क्षेत्रांची अधिकाधिक प्रसिद्धी करणे; मात्र उत्तर केरळमधील भयानक स्थिती लपवून ठेवणे
केरळमध्ये दक्षिण केरळ आणि उत्तर केरळ असे २ भाग आहेत. दक्षिण केरळमध्ये असलेले ‘बॅक वॉटर’ (खाडी), विविध प्रकारचे पर्यटन आदींची माहिती देऊन केरळचे सौंदर्य लोकांसमोर आणले जाते. याद्वारे पर्यटकांना केरळमध्ये आकर्षित केले जाते; मात्र उत्तर केरळमध्ये काय चालू आहे ? याची कुठेही वाच्यता करू दिली जात नाही. उत्तर केरळमध्ये मुसलमानांची संख्या अधिक आहे आणि यामुळे येथील एका जिल्ह्याला ‘मल्लापूरम्’ असे नाव देण्यात आले आहे. सद्यःस्थितीत केरळमध्ये ३२ टक्के मुसलमान आहेत आणि त्यांची मते ज्यांना मिळणार ते सत्तेवर येणार, हे साधे गणित आहे. यामुळे या ३२ टक्के एकगठ्ठा मतांना ठेच पोचेल, अशी कोणतीच कृती सत्ताधारी कधीही करत नाही. या ठिकाणच्या गावात शरीयत कायदा चालतो. या ठिकाणी दूरचित्रवाणी (टीव्ही) पहाता येत नाही, मुलींना बुरखा घातल्याविना बाहेर पडता येत नाही, तसेच त्यांना शाळा किंवा महाविद्यालय येथे जाता येत नाही. पूर्वी ख्रिस्ती मिशनरी करत असलेले धर्मांतराचे काम आता ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून केले जात आहे.
केरळमध्ये ५० सहस्रांहून अधिक मुलींचे धर्मांतर
केरळसारख्या आकाराने लहान असलेल्या राज्यात सुमारे ५ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. केरळमध्ये कोणताही उद्योग नाही, तर तेथील युवक केरळच्या बाहेर किंवा आखाती देशांमध्ये नोकरी करतात. तरीही ‘केरळ हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे’, असा प्रचार करणारी मोहीम (प्रपोगांडा) चालवली जाते. केरळमधील ३ मुख्यमंत्र्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालत असल्याचे खासगीत मान्य केले आहे; मात्र ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो ‘मोहीम चालवणारा (प्रपोगांडा करणारा) चित्रपट’ असे म्हणून हिणवले जाते. केरळमधील मुख्यमंत्र्यांनी एका वर्षी राज्यात ७ सहस्र ७१३ मुलींचे धर्मांतर झाल्याचे विधान तेथील विधानसभेत केले होते. केरळमध्ये आजच्या घडीला ५० सहस्रांहून अधिक मुलींचे धर्मांतर झालेले आहे. केरळमध्ये माझी नेहमी ये-जा असायची. साम्यवादी देशविरोधी कारवाया करतात आणि त्यांना भारताबद्दल प्रेम किंवा भारतीय संस्कृतीविषयी आपलेपणा नाही, हे कालांतराने माझ्या लक्षात आले. त्यामुळे मी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट किंवा अन्य लघुपट यांची निर्मिती केली. केरळमधील युवतींचे शिस्तबद्धरित्या आणि नियोजनबद्ध धर्मांतर करून त्यांना आखातात पाठवून त्यांचे कसे शोषण केले जाते, याविषयीचे भयानक प्रसंग शोषण झालेल्या मुलींकडे संवाद साधल्यावर मला लक्षात आले. केरळमधील सत्यस्थिती सर्वांसमोर यावी, नागरिकांमध्ये भारतीय संस्कृती किंवा देश यांविषयी अभिमान निर्माण व्हावा, यासाठी ‘द केरल स्टोरी’ आणि तत्सम् लघुपटांची निर्मिती माझ्याकडून झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंना देशात मानाचे स्थान मिळवून दिले ! – मोहनदास पै, उद्योजक आणि ‘मणिपाल ग्लोबल एज्युकेशन’चे अध्यक्षनरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर गरिबांच्या जीवनात आमूलाग्र पालट झालेला आहे. गरिबांच्या मूलभूत गरजा पुरवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतियांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण केला आहे. भारत जगातील पाचवी आर्थिक व्यवस्था आहे आणि ती पुढील काही वर्षांत तिसर्या स्थानावर पोचणार आहे. वर्ष १९५० पासून काँग्रेसने हिंदूंमध्ये जातींच्या आधारावर फूट घालून आणि मुसलमानांमध्ये भीती निर्माण करून त्यांची मते घेतली. भारतात पूर्वी हिंदू उघडपणे हिंदु म्हणायला लाजत होते. भारत हे सांस्कृतिकदृष्ट्या हिंदु आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आजच्या युवकांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांनी त्यांचा हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी अभिमान बाळगला पाहिजे, तसेच युवकांनी ध्येयाने प्रेरित होऊन कृतीशील झाले पाहिजे. देवस्थानने मिळकतीचा काही भाग समाजाच्या उद्धारासाठी वापरला पाहिजे, असे आवाहन उद्योजक आणि ‘मणिपाल ग्लोबल एज्युकेशन’चे अध्यक्ष मोहनदास पै यांनी केले. ‘चातुर्मास संवाद’ कार्यक्रमात २३ जुलै या दिवशी सकाळच्या सत्रात ते बोलत होते. सौ. शेफाली वैद्य यांनी त्यांच्याशी संवाद साधला. |
संपादकीय भूमिकाधर्मांध आणि साम्यवादी लव्ह जिहादच्या माध्यमातून देशविरोधी कारवाया करत असतांना त्या रोखण्यासाठी कठोर कायदा हवा ! |