सिंधुदुर्ग : वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वीजदेयके भरणार नाही !

खंडित वीजपुरवठ्यामुळे संतप्त तांबुळी ग्रामस्थांची चेतावणी

सावंतवाडी – गेल्या एक मासापासून गावातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरण आस्थापनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप करत तालुक्यातील संतप्त तांबुळी ग्रामस्थांनी महावितरणच्या बांदा येथील कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना खडसावले. ‘ग्रामस्थ येत असल्याचे समजताच साहाय्यक अभियंता अनिल यादव कार्यालयातून पसार झाले’, असा आरोप करत ‘जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत संपूर्ण गाव वीजदेयक भरणार नाही’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली. पूर्वकल्पना देऊनही अभियंता अनिल यादव उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी अभियंता कोहळे यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.

गावात वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी नादुरुस्त असल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते; मात्र पावसाळ्यापूर्वी वीजवाहिनीवर आलेली झाडे, झुडपे कापली गेली नाहीत. त्यामुळे विजेची समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ भरमसाठ देयके आकारली जातात. विविध सेवाकर आकारले जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही सेवा पुरवली जात नाही, असा आरोप करत ‘अभियंता अनिल यादव कामचुकार असून त्यांचे तातडीने स्थानांतर करावे’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी तांबुळीच्या सरपंच वेदिका नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४० हून अधिक गावे अंधारात ! – अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी काँग्रेस

‘महावितरण विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दक्षता घेतली न गेल्याने सावंतवाडी शहरासह कोनशी दाभिळ, भालावल या गावांतील लोकांवरही अंधारात रहायची वेळ आली आहे. सध्या ४० हून अधिक गावे अंधारात आहेत. अधिकार्‍यांनी पावसापूर्वी न घेतलेली दक्षता याला कारणीभूत आहे. असे असूनही वीज खंडित झाल्यावर किंवा एखादी घटना घडल्यावर वीज वितरणचे अधिकारी दूरभाष उचलत नाहीत. लोकांनी जायचे कुणाकडे ? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही परिस्थिती येत्या ४ दिवसांत न सुधारल्यास महावितरणसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.