नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत शिक्षकभरती
नवी मुंबई – महानगरपालिकेच्या शाळेत तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीमध्ये १८३ जागांसाठी १ सहस्र ३०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली. महापालिकेने थेट मुलाखतीद्वारे शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक विभागासाठी १२३, तर माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. ही नेमणूक तासिका तत्त्वावर केली जाणार आहे. एका तासिकेचे शुल्क १२५ रुपये इतके आहे. दिवसाला ६ तासिका याप्रमाणे दिवसाला ७५० रुपये याप्रमाणे ही नेमणूक केली जाणार आहे. जितके घंटे सेवा दिली जाईल, तितकेच मानधन दिले जाणार आहे. या भरतीसाठी पालिकेच्या मुख्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. संध्याकाळी ६ नंतरही इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी चालू होती. छाननी करून पात्र उमेदवारांना २ दिवसांत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणअधिकारी अरुणा यादव यांनी दिली.