आमचे पाप-ताप हरण करणारे दु:खहर्ता ।
सकल जनांसी प्रसन्न करणारे सुखकर्ता ।
तुम्ही विश्वातील सकल दीनांचे त्राता ।
आणि प्रत्येक प्राणीमात्राचे जीवनदाता ॥ १ ॥
तुमच्या अंत:करणातून वहाते गंगेसारखी निर्मळता ।
तुमच्या दृष्टीक्षेपातून अनुभवतो मातेप्रमाणे ममता ॥
तुमची भक्तवत्सलता अनुभवून वाटे आम्हासी धन्यता।
तुमच्या स्मरणमात्रे होते अंतर्मनाची शुद्धता ॥ २ ॥
तुमच्यात आहे पृथ्वीसारखी सहनशीलता आणि स्थिरता ।
आणि पाण्याप्रमाणे आहे पवित्रता आणि निर्मळता ॥
तुमच्यात आहे सागराप्रमाणे विशालता ।
आणि निळ्याभोर आकाशाप्रमाणे व्यापकता ॥ ३ ॥
तुम्हीच आमचे प्राणदाता ।
तुम्हीच आमचे भाग्यविधाता ॥
तुम्हीच अखिल विश्वाची माता ।
तुम्हीच सकल विश्वाचे विश्वविधाता ॥ ४ ॥
तुम्ही ब्रह्मचैतन्याचे दाता ।
श्रीनारायणस्वरूपी अन्नदाता ॥
तुम्हीच आमचे शिवमय ज्ञानदाता ।
तुम्हीच त्रिदेवरूपी महान विश्वदेवता ॥ ५ ॥
श्रीगुरूंच्या सेवेने दूर होते मनाची मलीनता ।
आणि श्रीगुरुस्मरणाने वाढते मनाची शुद्धता ॥
श्रीगुरुकृपेने दूर होते नैराश्य आणि उदासीनता ।
श्रीगुरुकृपेने लाभते चंचल मनासी स्थिरता ॥ ६ ॥
श्रीगुरुकृपेने जागृत होते हिंदु राष्ट्राप्रतीची अस्मिता ॥
श्रीगुरुकृपेने वाढते हिंदु धर्माप्रतीची समर्पितता ।
श्रीगुरुसेवा केल्याने वाढते निरपेक्षता ॥
श्रीगुरुकार्य करण्यासाठी लाभते आम्हा कार्यतत्परता ॥ ७ ॥
देवगणांहूनी श्रेष्ठ आहे तुमची श्रेष्ठता ।
ऋषींप्रमाणे झळकते तुमची विद्वत्ता ॥
तुम्ही दु:खातून तारणारे आमचे त्राता ।
सर्वज्ञ असूनही तुमच्या ठायी विलसते विनम्रता ॥ ८ ॥
ब्राह्मतेजाने युक्त आहे तुमची विद्वत्ता ।
क्षात्रतेजाने संपन्न आहे तुमची वीरता ॥
सर्वांंमध्ये शोभून दिसते तुमची दिव्यता ।
ब्रह्मांडाला व्यापून आहे तुमची भव्यता ॥ ९ ॥
तुम्ही साधकांची माता आणि पिता ।
ज्ञान, भक्ती आणि ऐश्वर्य यांचे तुम्हीच दाता ॥
तुम्ही सकलांचा उद्धार करणारे मुक्तीदाता ।
हृदयी चिरंतन वास करणारे तुम्ही मोक्षदाता ॥ १० ॥
देवगुरु बृहस्पतीहून प्रखर असे तुमची प्रगल्भता ।
सूर्याहून तेजस्वी असे तुमची दिव्यता ॥
तुमच्या सत्संगात लाभते चंद्राहूनही अधिक शीतलता ।
तुमच्या ओजस्वी वाणीतून अखंड वहाते मधुरता ॥ ११ ॥
गंगेहूनही पवित्र असे तुमच्या शुद्ध मनाची पवित्रता ।
कामधेनूहूनही श्रेष्ठ आहात तुम्ही सर्व दाता ॥
तुमच्या कृपेने लाभते आम्हास आध्यात्मिक प्रगल्भता ।
विश्वातील ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहे तुमची सर्वज्ञता ॥ १२ ॥
श्रीगुरुकृपेविना आमच्या जीवनात आहे अपूर्णता ।
श्रीगुरुकृपेनेच लाभते आमच्या जीवनास पूर्णता ॥
श्रीगुरुस्मरणात लाभली आम्हास तल्लीनता ।
श्रीगुरुकृपेनेच लाभली या जीवनास सार्थकता ॥ १३ ॥
श्रीगुरूंविषयी वाटते आम्हास अत्यंत आत्मीयता ॥
श्रीगुरुचरणांशी एकरूप होण्यास लाभो आम्हास पात्रता ।
श्रीगुरुवचन समजण्यास वाढू दे आमची योग्यता ।
श्रीगुरुकृपेने दूर होवोत आमच्यातील सर्व न्यूनता ॥ १४ ॥
श्रीगुरूंना पहाण्यासाठी वाढली माझी व्याकुळता ।
श्रीगुरूंच्या दर्शनाची लागली मजला आतुरता ॥
श्रीगुरुभेटीसाठी दाटली माझी उत्कटता ।
श्रीगुरूमाऊलीला पाहून वाटे मजला धन्यता ॥ १५ ॥
श्रीगुरूंप्रती शिष्यांची पाहून भावुकता ।
माझ्या अंतरी जागृत झाली आर्तता ।
श्रीगुरूंचे ऋण फेडण्यासाठी आहे माझी असमर्थता ।
तरीही श्रीगुरुदेवांच्या चरणी अर्पिते भावपूर्ण कृतज्ञता ॥ १६ ॥
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |