भोसरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पी.एम्.टी. चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षक नाहीत. वर्गखोल्याही नाहीत. त्यामुळे एका वर्गामध्ये अधिक विद्यार्थ्यांना बसवावे लागत आहे. २ वर्षांपूर्वी पाडलेल्या इमारतीचा राडारोडा आजही त्याच ठिकाणी आहे, तसेच मुलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आरोग्यही धोक्यात आले आहे.
या शाळेच्या २ इमारतींमध्ये कन्या शाळा क्र. १ आणि ३, मुलांची शाळा क्र. २ अन् ४ आणि इंग्रजी माध्यम, तसेच माध्यमिक अशा ६ शाळा भरतात. शाळेत अंदाजे ३ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २ वर्षांपूर्वी शाळेची एक इमारत धोकादायक म्हणून महापालिकेने पाडली. नवीन इमारतीचे बांधकाम केले नसल्याने उर्वरित २ इमारतींमध्ये शाळा भरते. महापालिकेने इमारत पाडल्यानंतर पत्राशेडच्या वर्गखोल्या सिद्ध केल्या आहेत; परंतु त्या पुरेशा नाहीत.
संपादकीय भूमिकाविद्यालयाची इतकी दुरवस्था होईपर्यंत कुणीच लक्ष कसे देत नाही ? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |