साधकाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेली अनुभूती

१ अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप चालू होणे : ‘१३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या दिवशी मला सकाळी जाग आली आणि आपोआप ‘श्री गुरुदेव दत्त ।’, असा माझा नामजप चालू झाला. तेव्हा ‘गुरुदेव, माझ्या सर्व अतृप्त पूर्वजांना पुढची गती मिळू दे आणि पूर्वजांचे त्रास दूर होऊ देत’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती. त्या वेळी ‘दत्तगुरूंना प्रार्थना न होता गुरुमाऊलींना प्रार्थना का होत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते.

१ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आपोआप चालू होणे : आम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ सोहळा दाखवण्यात आला. सोहळा चालू झाल्यावर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा सामूहिक नामजप एक घंटा सर्व साधकांना करावयास सांगण्यात आले. त्यानंतर आम्हाला गुरुमाऊलींचे श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन झाले. तेव्हा सकाळी ‘माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप का होत होता ?’, याचा मला उलगडा झाला.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या रथोत्सव सोहळ्याची अनुभवलेली दृश्ये आणि आलेली अनुभूती

२ अ. रथोत्सव सोहळ्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले साधक गोपींप्रमाणे वाटणे : आम्ही रथोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ बघत होतो. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधक हात जोडून उभे होते. ‘द्वापर युगात श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जात होता. तेव्हा गोपींची जशी भावावस्था झाली होती, तशीच साधकांची भावावस्था झाली होती’, असे मला जाणवले. माझाही भाव जागृत होत होता. मला साधक गोपींप्रमाणे वाटत होते.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले हे रथामध्ये विराजमान होते आणि त्यांच्या चरणांशी दोन्ही गुरुमाता (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) बसल्या होत्या. हे दृश्य अत्यंत भावविभोर करणारे होते. ते दृश्य माझ्या डोळ्यांत साठवले गेले.

२ इ. गुरुपौर्णिमेनंतर एक मास रथोत्सवाचे दृष्य अनुभवणे : ते अभूतपूर्व दृश्य पाहिल्यापासून त्या दृश्याची जेव्हा जेव्हा आठवण होते, तेव्हा तेव्हा त्या रथात ज्या पद्धतीने परात्पर गुरुदेव आणि दोन्ही गुरुमाता बसल्या होत्या, ‘तसे माझ्या आज्ञाचक्रावर परात्पर गुरुदेव विराजमान आहेत आणि दोन्ही डोळ्यांमध्ये दोन्ही गुरुमाता आहेत’, असे मला जाणवते. मी गुरुपौर्णिमेनंतर पुढे एक मास हे अनुभवत होतो.’

– श्री. विजय पाटील, भोर, पुणे. (२.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक