गुरुपदी असूनही स्वतःचे वेगळेपण जाणवू न देता साधकांमध्ये मिसळणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरूंच्या सगुण सहवासाचे क्षण साधकाच्या जीवनात अनमोल असतात. त्यांचे साधकांशी बोलणे, साधकांना घडवणे, चुका सांगणे, मार्गदर्शन करणे, वेळप्रसंगी सांभाळून घेणे, अशा विविध माध्यमांतून साधकाच्या अंतःकरणात ती दैवी शिकवण रुजत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोणतेही अवडंबर न करता साधकांसमवेत साधकाप्रमाणेच राहून त्यांना घडवले. त्यांनीच स्थापन केलेल्या सनातनच्या आश्रमातही ते ‘मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे’, या भावानेच रहातात. तेथेही साधकांकडून स्वतःची सेवा करून घेण्याऐवजी तेच साधकांना विविध सेवांत जमेल तितके साहाय्य करतात. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात ते समोरच्या व्यक्तीला पूरक होण्याचा किती प्रयत्न करतात, हे अनुभवता येते. समष्टीला आपलेसे करणारे दैवी गुण साधेपणा, सहजता, इतरांचा विचार, निरपेक्ष प्रीती यांचा उच्च बिंदू म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! त्यांच्या ठायी भगवंताच्या सर्वच गुणांची प्रचीती येते. स्वतःचा कोणताही वेगळा लवाजमा न ठेवता सहजतेने साधकांच्या टप्प्याला येऊन त्यांच्यासमवेत रहाण्याच्या संदर्भात साधकांनी अनुभवलेले काही क्षण येथे देत आहोत !

विद्युत् जनित्र ठेवण्यासाठीच्या कक्षाच्या बांधकामाच्या वेळी साधकांसह सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २०००)

१. अभ्यासवर्गाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्व साधकांच्या समवेत एका जुन्या धर्मशाळेत रहाणे

एकदा रत्नागिरी येथे परात्पर गुरु डॉक्टरांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आम्ही सर्व साधक तेथील एका जुन्या धर्मशाळेत राहिलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनीही आमच्या समवेत निवास केला. तेथे अत्यंत अंधारलेले, दगडी आणि अस्वच्छ असे स्नानगृह होते. परात्पर गुरु डॉक्टर हे आरोग्य आणि स्वच्छता यांविषयी अत्यंत दक्ष असतात, तसेच ते एक मोठे डॉक्टर आणि महान विभूती आहेत. ते इंग्लंडमधील अत्यंत उच्चभ्रू प्रासादांमध्ये राहिलेले आहेत. असे असूनही त्यांनी काहीही गार्‍हाणे न करता याच स्नानगृहात अंघोळ केली. या कृतीने त्यांनी आम्हा सर्व साधकांसमोर एक आदर्श निर्माण केला.’ – डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा.

२. चप्पल दुरुस्तीला देतांना ती कागदात गुंडाळून देणे आणि साधिका विसरणार नाही, अशा ठिकाणी स्वतःच नेऊन ठेवणे

परात्पर गुरु डॉक्टरांची खोलीतल्या खोलीत घालायची चप्पल एका कडेने झिजली होती. एकदा बांधकाम सेवेतील साधक श्री. प्रकाश सुतार यांच्याकडे त्यांची चप्पल दुरुस्त करायला द्यायची होती, त्या वेळी त्यांनी मी प्रकाशदादाला ओळखते का ? हे विचारून घेतले आणि जातांना मला चप्पल घेऊन जाण्यास सांगितले. त्यांनी ती माझ्याकडे दिली असती, तर मी तशीच घेऊन गेले असते; पण त्यांनी चप्पल कागदात गुंडाळली आणि मला विचारले, ‘‘कुठे ठेवू, म्हणजे तू विसरणार नाहीस ?’’ मी त्यांना जागा दाखवली आणि त्यांनी तिथे चप्पल ठेवली.

– कु. दीपाली मतकर (आताच्या सनातनच्या धर्मप्रचारक संत पू. दीपाली मतकर), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. मार्गिकेतून येतांना बाहेर वापरायच्या चपला स्वतःच हातात घेऊन येणे

 

बाहेरून आल्यानंतर चपला हातात घेऊन मार्गिकेतून चालत जाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

 

एकदा परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू सद्गुरु अप्पाकाका आश्रमात आले होते. ते जातांना परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या गाडीपर्यंत त्यांना निरोप देण्यासाठी गेले. परत येतांना परात्पर गुरु डॉक्टर बाहेर वापरायच्या त्यांच्या चपला हातात घेऊन मार्गिकेतून भिंतीला धरून चालत येत होते. मी लांबून पाहिल्यावर जवळ जाऊन त्यांना म्हणाले, ‘‘मी चपला खोलीत नेऊन ठेवते.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मी अजून ही सेवा करू शकतो. मी म्हातारा होईन, तेव्हा तू कर.’’ ते गुरुभावात न रहाता ‘मी गुरूंच्या आश्रमात रहातो, तर मीही शिष्यच आहे’, या भावाने ते आश्रमात रहातात. त्यामुळे ते करू शकणार्‍या सर्व गोष्टी स्वतः करतात.

– सौ. साक्षी नागेश जोशी, तळावली, फोंडा, गोवा.

४. साधकासमवेत देण्याचा खोका स्वतः उचलून पहाणे आणि साधकालाही तो उचलून पहाण्यास सांगणे

‘आपले जुने साधक अमरजीत एकदा रामनाथी आश्रमात आले होते. ते परत जातांना त्यांच्यासह मुंबईतील सेवाकेंद्रात ग्रंथांचा एक खोका द्यायचा होता. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी ‘अमरजीतभैयाला पाठीचा त्रास नाही ना ? तो खोका घेऊन जाऊ शकतो का ?’ याविषयी माझ्याकडे विचारणा केली. ‘तो खोका घेऊन जाऊ शकतो’, असे मी सांगितल्यानंतर साधकांनी तो खोका आणून दिला. केवळ माझ्या उत्तरावर विसंबून न रहाता प.पू. डॉक्टरांनी स्वत:ला शारीरिक त्रास होत असूनही तो खोका उचलून बघितला आणि अमरजीतभैयालासुद्धा उचलून बघायला सांगितले. या प्रसंगातून ‘प.पू. डॉक्टर त्यांच्यातील प्रेमभावामुळे इतरांचा बारकाईने कसा विचार करतात’, हे मला शिकायला मिळाले.’

– श्री. मनोज नारायण कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), कवळे, फोंडा, गोवा.

५. साधक खोलीत पठण करत असतांना त्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे

‘काही वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरील अरिष्ट टळावे, यासाठी त्यांच्या खोलीत साधक प्रतिदिन एक ते सव्वा घंटा मारुतिस्तोत्राचे पठण करायचे. या कालावधीत त्यांच्या खोलीत कुणी साधक सेवेनिमित्त आल्यास गुरुदेव त्यांच्याशी हळू आवाजात बोलायचे. त्यांना कधी ध्वनीचित्र-चकती पाहून सुधारणा करण्याची सेवा असल्यास ते तिचा आवाज हळू ठेवायचे. ते ‘हे सर्व नम्रतेने करतात’, असे मला जाणवले. त्यांच्यातील ‘नम्रता आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण साधकांना शिकण्यासारखे आहेत.

बेळगाव, कर्नाटक येथील पू. डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९१ वर्षे) यांना ‘व्हिलचेअर’ वरून नेतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि समवेत सौ. विजया दीक्षित (वर्ष २०१९)

६. पठण करण्यासाठी खोलीत येणार्‍या साधकांची काळजी घेणे

त्यांच्या खोलीत जातांना आम्ही दार उघडण्यापूर्वीच त्यांनी दार उघडले असल्यास ते हाताने दार धरून हसतमुखाने आणि आदराने आम्हाला आत येण्यास सांगायचे. मी आणि श्री. मुळ्येकाका त्यांच्या खोलीत पठणासाठी गेल्यावर पंखा चालू नसल्यास ते स्वतः पंखा चालू करायचे. खोलीत प्रकाश अपुरा असल्यास ते स्वतः खिडक्यांचे पडदे बाजूला करायचे. बर्‍याच वेळा आम्ही त्यांच्या खोलीत जाण्यापूर्वी ते खोलीतील वातानुकूलित यंत्र चालू करून ठेवत असत.

७. कापूर-आरती शांत झाल्यावर निरांजन धुण्यासाठी योग्य ठिकाणी ठेवणे

कापूर आरती झाल्यावर ते आम्हाला आधीच सांगून ठेवत, ‘‘तुम्ही निरांजन शांत होईपर्यंत थांबू नका.’’ यात त्यांचा ‘आमचा वेळ वाया जाऊ नये’, असा दृष्टीकोन असायचा. निरांजन शांत झाल्यावर ते स्वतः निरांजन योग्य ठिकाणी धुण्यासाठी ठेवत.

८. जेवणाचा डबा धुऊन ठेवणे

ते दोन वाट्यांत आणलेले जेवण जेवायचे. ते जेवतांनाही वाचन करायचे, त्याचसमवेत त्यांचे अन्न व्यवस्थित चावण्याकडेही लक्ष असे. ते कुठेच वेळ वाया घालवत नाहीत. ते जेवण झाल्यावर वाट्या स्वच्छ धुऊन ठेवतात. त्यांचा सतत ‘दुसर्‍यांना त्रास होऊ नये’, असा प्रयत्न असतो.’

–  आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

९. साधकांनी खाऊ पाठवल्यास वेगळे जेवण न बनवण्याचा निरोप देणे

‘पूर्वी साधक घरून त्यांच्यासाठी काही पदार्थ बनवून आणायचे. त्या वेळी ते त्यांच्या जेवणाची सेवा करणार्‍या साधिकेला ‘माझ्यासाठी वेगळे जेवण बनवू नकोस’, असे सांगत. यावरून त्यांचा ‘साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा विचार असायचा.’

– कु. कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.