प्रतिमास दीड लाख रुपये वेतन असतांनाही सरकारी आधुनिक वैद्यांचा खासगी व्‍यवसायावर जोर !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक आरोग्‍य विभागात कार्यरत असलेल्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना खासगी ‘प्रॅक्‍टिस’ न करण्‍यासाठी मूळ वेतनाच्‍या ३५ टक्‍के व्‍यवसायरोध भत्ता (नॉन प्रॅक्‍टिसिंग अलौन्‍स – एन्.पी.ए.) देण्‍यात येतो. एन्.पी.ए. आणि सर्व भत्ते मिळून तब्‍बल दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेऊनही काही सरकारी आधुनिक वैद्य खासगी प्रॅक्‍टिस करत असल्‍याचे ‘डीबी स्‍टार’ने केलेल्‍या ‘स्‍टिंग ऑपरेशन’मधून समोर आले आहे.

स्‍वत:ची मोठी रुग्‍णालये उभारली !

जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागांतर्गत येणार्‍या आडूळ येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घुले, गोलटगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडके-पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात टोलेजंग रुग्‍णालये उभारून स्‍वत:च्‍या नावाने वैद्यकीय व्‍यवसाय चालू केला आहे. खासगी कामात मिळणार्‍या पैशांच्‍या मोहापायी शासकीय रुग्‍णालयाच्‍या वेळेत न पोचणे, विशिष्‍ट रुग्‍णांना पडताळणे, विलंबाने येऊन लवकर जाणे असे प्रकार यांच्‍याकडून होतात. ग्रामीण भागात रुग्‍णांना वेळेत आवश्‍यक त्‍या वैद्यकीय सुविधा न मिळण्‍यामागे हे एक मोठे कारण आहे. आधुनिक वैद्य सरकारी रुग्‍णालयात आलेल्‍या रुग्‍णाला मोठा आजार किंवा अपघातग्रस्‍त रुग्‍ण असल्‍यास केवळ प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे ते स्‍वतः व्‍यवसाय करत असलेल्‍या रुग्‍णालयामध्‍ये हालवण्‍याचा समुपदेश देतात.

वरिष्‍ठ आणि राजकीय मंडळींशी चांगले संबंध असले, तर कुणीच कारवाई करू शकत नाही !

सिडको एन्-२ मधील चेरी नेत्र रुग्‍णालयातील आधुनिक वैद्य सुरेश गोरख घुले हे आडूळ येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. घुले यांनी चेरी नेत्र रुग्‍णालयाच्‍या धारिका आणि ‘प्रिस्‍क्रिप्‍शन’वर स्‍वत:चे नाव नमूद केले आहे. डॉ. घुले म्‍हणाले की, तालुका आरोग्‍य अधिकारीही आमच्‍याच दर्जाचा असतो. त्‍यामुळे तो काही करू शकत नाही. आमच्‍या वरिष्‍ठांना सर्व ठाऊक असते. त्‍यांच्‍याशी आर्थिक हितसंबंध चांगले असल्‍यास कुणीच कारवाई करू शकत नाही.

सिडको एन्-४ मध्‍ये पाटील रुग्‍णालय नावाने मोठी इमारत आहे. या ठिकाणी बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत घोडके (पाटील) हे स्‍वत: व्‍यवसाय करतात. प्रत्‍यक्षात त्‍यांची नेमणूक गोलटगाव येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वैद्यकीय अधिकारी या पदावर आहे. पाटील रुग्‍णालयामधील एका कर्मचार्‍याने सांगितले, ‘डॉक्‍टर येथे प्रतिदिन उपलब्‍ध असतात. आठवड्यातून एखादा दिवस सरकारी रुग्‍णालयात जातात.’

पत्नी आणि नातेवाईक यांच्‍या नावाने रुग्‍णालये !

खासगी व्‍यवसाय करणार्‍या आधुनिक वैद्यांनी पती-पत्नी किंवा अन्‍य नातेवाईक यांच्‍या नावाने रुग्‍णालये चालू केली आहेत. खासगी व्‍यवसाय करणार्‍या एका सरकारी आधुनिक वैद्याने सांगितले की, स्‍थानिक अधिकार्‍यांपासून जिल्‍हास्‍तरावरील अधिकार्‍यांपर्यंत सर्वांशी आर्थिक संबंध असल्‍याने आमचा व्‍यवसाय बिनदिक्‍कत चालू आहे. (पत्नी आणि नातेवाईक यांच्‍या नावांवर रुग्‍णालये उभारल्‍याची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकार्‍यांसह शासकीय रुग्‍णालयाच्‍या अधिष्‍ठातांनाही असून ते काहीच कारवाई करत नाहीत, यामुळे यामध्‍ये सर्वांचाच सहभाग असल्‍याचे लक्षात येते. त्‍यामुळे संबंधितांची चौकशी होणे आवश्‍यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

रुग्‍णांच्‍या जिवापेक्षा आर्थिक हितसंबंध जपून स्‍वार्थ साधून घेणारे आधुनिक वैद्य आरोग्‍य क्षेत्रासाठी कलंकच होत !