वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात पार पडले ‘द रॅशनलिस्‍ट मर्डर्स’ (पुरोगाम्‍यांच्‍या हत्‍या) मागील सत्‍य आणि ‘हिंदुहितासाठी न्‍यायालयीन सुधारणा’ यांचे सत्र !

नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍यांच्‍या प्रकरणांमध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठांना गोवण्‍याचे षड्‍यंत्र ! – डॉ. अमित थडानी, शल्‍य चिकित्‍सक, समाजसेवक तथा लेखक

डॉ. अमित थडानी

विद्याधिराज सभागृह (रामनाथी, गोवा) – सनातन संस्‍था लोकांना संघटित करते. त्‍यामुळे तिला नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍या प्रकरणांमध्‍ये लक्ष्य करण्‍यात आले. या प्रकरणांमध्‍ये खरे मारेकरी शोधण्‍याचा प्रयत्न न करता अन्‍वेषण करण्‍यात आले. या सर्व प्रकरणांमध्‍ये कुठेही ठोस पुरावे मिळाले नसून केवळ राजकीय लाभ घेण्‍यासाठी प्रयत्न झाला आहे. तत्‍कालीन सरकारने देशात ‘हिंदुत्‍वनिष्‍ठ हे आतंकवादी आहेत’, हे ‘नॅरेटिव्‍ह’ (कथानक) उभे करण्‍यासाठी या प्रकरणांमध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठांना गोवले. त्‍यामुळे पुरोगाम्‍यांच्‍या हत्‍या प्रकरणांमध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठांना गोवण्‍यामागे एक मोठे षड्‍यंत्र असल्‍याचे स्‍पष्‍ट होते, असे ठाम मत शल्‍य चिकित्‍सक, समाजसेवक तथा लेखक डॉ. अमित थडानी यांनी व्‍यक्‍त  केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ते बोलत होते. नास्‍तिकतावाद्यांच्‍या हत्‍या प्रकरणांत हिंदुत्‍वनिष्‍ठांना गोवण्‍यामागील षड्‌यंत्र उघड करणारे ‘द रॅशनालिस्‍ट मर्डर्स’ (पुरोगाम्‍यांच्‍या हत्‍या) हे पुस्‍तक डॉ. थडानी यांनी लिहिले आहे.

 डॉ. अमित थडानी म्‍हणाले …

१. अन्‍वेषण यंत्रणेने दाभोलकर हत्‍या प्रकरणामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठांना कायदेशीर साहाय्‍य करणारे अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांना अटक केली. उद्या सरकारच्‍या विरोधात न्‍यायालयीन खटला लढल्‍या जाणार्‍या अधिवक्‍त्‍यांनाही अटक करण्‍यात येणार का ? प्रशांत भूषण यांसारखे अधिवक्‍ते गुन्‍हेगारांचे खटले लढतात; म्‍हणून त्‍यांनाही अटक करणार का ?

२. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या सर्वांच्‍या हत्‍या प्रकरणांमध्‍ये जाणीवपूर्वक हिंदुत्‍वनिष्‍ठांना गोवण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. या सर्व प्रकरणांमध्‍ये सतत आरोपी पालटण्‍यात आले. अन्‍वेषण यंत्रणांनी कुठेही खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्‍याचा प्रयत्न केला नाही. केवळ हिंदुत्‍वनिष्‍ठांना लक्ष्य करणे, हेच अन्‍वेषण यंत्रणांचे ध्‍येय होते.


हिंदूंची सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे ! – पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय तथा संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

आता श्रीराममंदिर बनत आहे; पण धर्मांध आक्रमकांनी अतिक्रमण केलेली सर्व मंदिरे परत मिळवणे, हा आमचा प्रण आहे. त्‍यांच्‍या कह्यातून मथुरा, काशी, धार (मध्‍यप्रदेश) आणि ताजमहल येथील हिंदूंची धार्मिक स्‍थळे मुक्‍त करण्‍यासाठी आमचा संघर्ष चालू आहे, असे मार्गदर्शन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे संरक्षक पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन यांनी केले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात १८ जून या दिवशी बोलत होते.

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन पुढे म्‍हणाले, ‘‘एके काळी ‘सोने की चिडिया’ असणारा हिंदूंचा भारत आता इतिहास बनला आहे आणि हिंदूंना त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वासाठी न्‍यायालयात अन् न्‍यायालयाच्‍या बाहेर लढाई लढावी लागत आहे. हिंदु राष्‍ट्रासाठी संघर्ष करत असतांना आपण इतिहासामध्‍ये धर्मासाठी बलीदान देणार्‍या धर्मयोद्ध्यांना विसरत चाललो आहोत. अशा सहस्रो धर्मयोद्ध्यांंची नावे घेतल्‍याविना आपण पुढे जाऊ शकत नाही. महाराणा प्रताप, शीख धर्मगुरु यांनी हिंदु धर्माच्‍या रक्षणार्थ बलीदान केले; पण पराभव स्‍वीकारला नाही. आपल्‍याला त्‍यांच्‍याहून अधिक संघर्ष करून हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना केली पाहिजे, तरच त्‍या धर्मयोद्ध्यांना शांती मिळेल. भारताच्‍या राज्‍यघटनेने निर्माण केलेल्‍या वर्तमान व्‍यवस्‍थेमध्‍ये कोणतेही सरकार आले, तरी ते या देशाला हिंदु राष्‍ट्र बनवू शकत नाहीत. तसे झाले, तर त्‍याला आव्‍हान देण्‍यात येईल. त्‍यामुळे हिंदूंनाच संघटित होऊन हिंदु राष्‍ट्र मिळवणे आवश्‍यक आहे.’’


सनातन संस्‍था सांगत असलेल्‍या साधनेच्‍या बळावर समाजातील नकारात्‍मक शक्‍तीशी लढून हिंदु राष्‍ट्र आणू शकतो ! – अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती पी

मी ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्‍या (पी.एफ्.आय.च्‍या) विरोधात खटला लढत आहे. यापूर्वी हा खटला लढवणार्‍या अधिवक्‍त्‍यांनी या खटल्‍यातून माघार घेतली; कारण तेथे ‘पी.एफ्.आय’चे कार्यकर्ते मैसुरू जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या आवारात अधिवक्‍त्‍यांची छायाचित्रे आणि व्‍हिडिओ काढत अन् त्‍यांना धमक्‍या देत असत. माझ्‍या संदर्भातही तेच केले; परंतु नामस्‍मरण करत असल्‍यामुळे मला त्‍याची भीती वाटली नाही. मला मिळत असलेल्‍या धमक्‍यांविषयी न्‍यायाधिशांना कळल्‍यावर मला संरक्षण देण्‍यात आले, तरीही माझ्‍यावर आक्रमण झाले. नामस्‍मरण करत असल्‍याने मला आता कुठल्‍याच प्रकारची भीती वाटत नाही. त्‍यामुळे हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्‍त्‍यांनी प्रवास करतांना, आपली सुनावणी चालू होईपर्यंत जेव्‍हा वेळ मिळेल, तेव्‍हा नामस्‍मरण करावे. येथे सनातन संस्‍था शिकवत असलेले स्‍वभावदोष निर्मूलन शिकून कृतीत आणा. त्‍यामुळे समाजातील नकारात्‍मक शक्‍तींशी लढून आपण हिंदु राष्‍ट्र आणू शकतो, असे प्रतिपादन कर्नाटकातील हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती पी. यांनी केले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या ‘पी.एफ्.आय. : भविष्‍यकालीन संकट’ या विषयावर बोलत होते.

ईश्‍वराप्रती भाव आणि निरपेक्षपणे धर्मकार्य करणारे अधिवक्‍ता पी. कृष्‍णमूर्ती ! – पू. रमानंद गौडा, कर्नाटक

पू. रमानंद गौडा

१८ जून २०२३ या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या पहिल्‍या सत्रामध्‍ये ‘कर्नाटक येथील अधिवक्‍ता पी. कृष्‍णमूर्ती यांच्‍याकडे पाहून काय वाटते ?’ असा सूक्ष्मातील प्रयोग घेण्‍यात आला. या वेळी सभागृहातील बहुतांश हिंदुत्‍वनिष्‍ठांना अधिवक्‍ता पी. कृष्‍णमूर्ती यांच्‍याकडे पाहून आनंद जाणवला. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना पिठाच्‍या यति मां चेतनानंद सरस्‍वती यांनी ‘पी. कृष्‍णमूर्ती यांच्‍या चेहर्‍यावर साधनेचे तेज आहे. ते धर्मनिष्‍ठ आहेत. ते निष्‍ठापूर्वक धर्मकार्य करतात’, असे त्‍यांच्‍याकडे पाहून जाणवत असल्‍याचे सांगितले. अधिवक्‍ता पी. कृष्‍णमूर्ती यांची आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के आहे.

या वेळी सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी अधिवक्‍ता पी. कृष्‍णमूर्ती यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये उलगडली. ते म्‍हणाले, ‘‘अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती भगवंताच्‍या अनुसंधानात असतात. त्‍यांचा नामजप सतत चालू असतो. प्रवासाच्‍या वेळी ते वाहनात इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने लावतात. भजने ऐकतांना त्‍यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्‍वत: व्‍यय करून विविध गावांमध्‍ये जाऊन हिंदुत्‍वनिष्‍ठांना कायदेशीर साहाय्‍य करतात. त्‍यांचे कार्य निरपेक्ष असते. सध्‍या कर्नाटकमध्‍ये हिंदुत्‍वाच्‍या कार्यासाठी ते अधिवक्‍त्‍यांचे संघटन करत आहेत. व्‍यष्‍टी साधना आणि धर्मप्रसाराचे समष्‍टी कार्य करण्‍याचे ते एक उत्तम उदाहरण आहेत.

एकदा ३-४ घंटे प्रवास करून ते एका खटल्‍यासाठी न्‍यायालयात पोचले होते; पण तेथे गेल्‍यावर न्‍यायाधीश सुट्टीवर असल्‍याचे कळले. दुसर्‍या अधिवक्‍त्‍याने त्‍यांना याविषयी विचारल्‍यावर त्‍यांनी ‘ईश्‍वरेच्‍छा’, असे सांगितले. त्‍यांच्‍या मनात याविषयी कुठलाही विचार किंवा प्रतिक्रिया आली नव्‍हती.

काही मासांपूर्वी अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण झाले होते. त्‍या वेळी ‘भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्‍यांचे रक्षण केले. मला अजून पुष्‍कळ कार्य करायचे आहे’, अशा प्रकारे त्‍यांनी भाव व्‍यक्‍त केला. ते एक धर्मवीर आहेत.’’


हिंदुविरोधी ‘नॅरेटिव्‍ह’च्‍या (कथानकाच्‍या) विरोधात हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्‍त्‍यांनी एकत्रित लढणे आवश्‍यक ! – अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर

वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्‍फोटाच्‍या प्रकरणातील कथित आरोपी साध्‍वी प्रज्ञासिंह अटकेत असतांना त्‍यांच्‍यावर एका मुसलमान महिलेने कारागृहात आक्रमण केले. खटल्‍याच्‍या सुनावणीच्‍या वेळी साध्‍वी प्रज्ञा सिंह यांच्‍या निर्दोषत्‍वाविषयी सांगतांना एका भाविकाचा सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालयात मृत्‍यू झाला. ही वृत्ते कुठेच प्रसिद्ध झाली नाहीत. मालेगाव बाँबस्‍फोटातील आरोपींची सुटका झाल्‍यानंतर ‘हिंदूंना आतंकवादी ठरवण्‍यासाठी काँग्रेसने कसे षड्‍यंत्र रचले’, याविषयी वर्ष २०१२ मध्‍ये आम्‍ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचे वृत्त वृत्तवाहिन्‍यांवर दाखवण्‍यात आले नाही. याउलट हिंदुत्‍वनिष्‍ठांना बाँबस्‍फोट केल्‍याच्‍या अनेक बातम्‍या प्रसिद्ध झाल्‍या. अशा प्रकारे हिंदुविरोधी ‘नेरेटिव्‍ह’ पसरवले जात आहे. त्‍याच्‍या विरोधात आपणाला एकत्रित लढायला हवे. हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍ये फूट पाडण्‍याचे हे षड्‍यंत्र आहे. अधिवक्‍ता एक योद्धा आहे. हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या पाठीशी अधिवक्‍त्‍यांनी ठामपणे उभे राहिल्‍यास हिंदुत्‍वासाठी कार्य करणार्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढतो. कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश येथे हिंदुत्‍वासाठी कायदेशीर साहाय्‍य करणारे अधिवक्‍ता सिद्ध झाले आहेत. हिंदुत्‍वाच्‍या समान विचारधारेने आपणाला पुढे जायला हवे. हे कार्य करतांना आपणाला घाबरण्‍याचे कारण नाही; कारण आपल्‍या पाठीशी भगवंत आहे.


हिंदु संस्‍कृतीवरील आक्रमणांना विरोध करण्‍यासाठी अधिवक्‍त्‍यांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्‍यास करावा ! – अधिवक्‍ता श्रीधर पोतराजू, सर्वोच्‍च न्‍यायालय, देहली

अधिवक्‍ता श्रीधर पोतराजू

स्‍वातंत्र्यापूर्वी भारतात न्‍यायालयीन कामकाजात वेद-शास्‍त्रे यांचा संदर्भ अभ्‍यासला जात असे आणि त्‍याप्रमाणे निर्णय दिला जात होता; परंतु आता कायद्यांच्‍या पाश्‍चात्त्यीकरणामुळे तेथील संदर्भांचा वापर केला जात आहे. स्‍वातंत्र्यानंतर साम्‍यवाद्यांच्‍या बौद्धिक विकृतीने भारतात घट्ट आणि बळकट जाळे निर्माण केले. सध्‍या नव्‍याने येऊ पहाणारे समलैंगिक विवाहासारखे निर्णय हे हिंदूंची कौटुंबिक, सामाजिक आणि विवाह संस्‍था यांवरील आक्रमण आहे. अशा आक्रमणांना विरोध करण्‍यासाठी अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या धर्मग्रंथांचा आधार घ्‍यावा आणि त्‍यांचा अभ्‍यास करावा. त्‍याप्रमाणे त्‍या संदर्भांचा उपयोग अधिवक्‍त्‍यांना न्‍यायालयीन खटल्‍यात करता येईल. सध्‍या भारतात इंग्रजांनी आणलेले कायदे कार्यरत आहेत की, जे भौतिकतेवर आधारित आहेत. याउलट हिंदु धर्मशास्‍त्रात वाद-विवादातून निष्‍कर्ष काढून अंतिम सत्‍यापर्यंत पोचण्‍याचा प्रयत्न केला जातो. त्‍यामुळेच आपल्‍या न्‍यायव्‍यवस्‍थेचे घोषवाक्‍य ‘सत्‍यमेव जयते’ आहे, असे मी मानतो. या वाक्‍यातून सत्‍याचा शोध घेण्‍यासाठी नैतिक लढा देण्‍याची प्रेरणा आणि बळ मिळते. रामजन्‍मभूमीचा लढा हा केवळ भूमीचा लढा नसून तो श्रीरामाच्‍या जन्‍माचे सत्‍य शोधण्‍याचा लढा होता आणि तो त्‍याच्‍याच कृपेने जिंकता आला.