‘एम्.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या वतीने १५ ते १७ जून मुंबईत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे आयोजन !

देशभरातील २ सहस्र ५०० पेक्षा अधिक आमदार सहभागी होणार !

पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती पत्रक दाखवतांना उपस्थित मान्यवर

कोल्हापूर, ११ जून (वार्ता.) –  नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच ‘एम्.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’च्या वतीने १५ ते १७ जून या कालावधीत मुंबईत ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात देशभरातील २ सहस्र ५०० पेक्षा अधिक आमदार सहभागी होणार असून हे संमेलन ‘बीकेसी जीओ सेंटर’मध्ये होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘गोकुळ दूध संघा’चे संचालक अजित नरके, रवी पाटील, प्रकाश महाले आणि बीना देशमुख उपस्थित होत्या.

१. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सर्वांगिण शाश्‍वत विकास या त्रिसुत्रीचा विचार करून हे संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात ४० समांतर सत्र आणि ‘गोलमेज परिषद’ होणार आहे.

२. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, मनोहर जोशी आणि ओम बिर्ला यांच्यासह माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, हे या संमेलनाचे मार्गदर्शक अन् संयोजक आहेत.

३. या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्‍वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजनाः सर्व नागरिकांचा उत्कर्ष, तसेच आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार, या विषयांवर चर्चा होणार आहे.

४. गोलमेज परिषदेत राजकारणाचे अध्यात्मिकीकरण, आध्यात्मिक प्रमुखांशी चर्चा, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, तसेच संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांची चर्चा होणार आहे.

५. या संमेलनात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील आमदारांचा एकमेकांमध्ये संवाद घडवणे, सुशासनाच्या सूत्रांवर शिकणे, तसेच अन्य घडामोडी यांचा समावेश आहे.

६. या संमेलनातून आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्‍वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, अभिनव व्यापक दृष्टी आणि निश्‍चित दिशा मिळणार आहे.