राजगड (जि.पुणे), २ जून (वार्ता.) – समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २ जून या दिवशी राजगडावर भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याला विविध मावळ्यांच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती.
सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते मावळ्यांच्या वंशजांना गौरवण्यात आले. त्यानंतर गोरक्षण कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी गोरक्षक ऋषिकेश कामठे यांना समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तसेच शरद मोहोळ यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या वेळी ‘रणधुरंधर संताजी’ या चित्रपटाच्या चित्रफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी गुरुकुल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ दाखवले.
मावळ्यांच्या वंशजांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याशी चर्चा !
या वेळी उपस्थित ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी विविध मावळ्यांच्या वंशजांशी चर्चा केली. या वेळी मावळ्यांच्या वंशजांनी श्री. सुनील घनवट यांच्याशी बोलतांना सांगितले की, गड-दुर्गांवर अतिक्रमण झाले असून गड-दुर्ग संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ने मोर्चा काढला होता. त्या वेळी आम्ही उपस्थित होतो; पण याविषयी शासनाने जे आश्वासन दिले होते, त्याची मर्यादा संपून गेली आहे. अद्यापही काही निर्णय झालेला नाही. शासनाने लवकरात लवकर गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त करावेत. आम्हीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि बैठक घेण्यासाठी सांगणार आहोत.