१. ‘गुरुदेव’ हा नामजप करतांना सर्वच महाभूतांचे दर्शन होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये पंचमहाभूते स्थिरावली आहेत’, असे जाणवून भावजागृती होणे
‘१७.६.२०२१ या दिवशी भावसत्संगात ‘तेजतत्त्व (अग्नितत्त्व)’ या विषयावर माहिती सांगण्यात आली. यामध्ये कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रित केलेला ‘गुरुदेव’ हा नामजप ऐकवण्यात आला. तो ऐकतांना मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि त्यांच्या सभोवताली ‘पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) स्थित आहेत’, असे दिसले. प्रत्यक्षात सत्संग केवळ तेजतत्त्व स्वरूपी ‘अग्नि’ या विषयावर होता; परंतु ‘गुरुदेव’ हा नामजप करतांना मला सर्वच महाभूतांचे दर्शन झाले. ‘गुरुदेवांमध्ये पंचमहाभूते स्थिरावली आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.
२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी डोक्यावर सूक्ष्मातून हात ठेवला आहे’, असे जाणवून त्यांच्या हाताचा स्पर्श अनुभवणे आणि त्यामुळे भावावस्था अनुभवता येऊन ती सत्संगानंतरही पुष्कळ वेळ टिकून रहाणे
भावसत्संगाच्या शेवटी ‘गुरुविन नाही दुजा आधार’ हे भक्तीगीत लावले होते. ते ऐकत असतांना मला सभोवतालचा विसर पडला. ‘सर्वत्र केवळ गुरुदेवच व्यापून आहेत’, असे दिसत होते. गीत संपल्यावर ‘परात्पर गुरुदेवांनी माझ्या डोक्यावर सूक्ष्मातून हात ठेवला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी प्रत्यक्ष त्यांच्या हाताचा स्पर्श अनुभवला. त्यांच्या स्पर्शामुळे मला भावावस्था अनुभवता आली. ही भावावस्था सत्संगानंतरही पुष्कळ वेळ टिकून होती.
‘हे गुरुराया, या घनघोर आपत्काळात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतील सत्संगाचा आम्हाला लाभ झाला. गुरुदेव, चराचरात तुमचे अस्तित्व असून तुम्ही आमच्यावर सदैव कृपेचा वर्षाव करत आहात, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |