कोकणातील आपत्ती नियंत्रणाविषयीचे धोरण ३ दिवसांत घोषित करणार !

मुंबई, २७ मे (वार्ता.) – मागील काही वर्षांत कोकणामध्ये चक्रीवादळ येणे, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्ती घडून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड येथे राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाचे पथक चालू करण्याची मागणी राज्यशासनाकडून केंद्राकडे करण्यात आली होती; मात्र यावर अद्याप धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तातडीने साहाय्य कसे करायचे ? हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता कोकणातील आपत्ती नियंत्रणाविषयीचे धोरण येत्या ३ दिवसांत घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती नियंत्रण धोरण राज्यशासनापुढे २९ मे या दिवशी मांडण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. आपत्ती नियंत्रणासाठी सध्या राज्यात केंद्रीय आपत्ती नियंत्रण दलाची १८ पथके, तर राज्य आपत्ती नियंत्रण दलाची २ पथके कार्यरत आहेत.